कोल्हापूर : केंद्र शासनामार्फत कोल्हापूर शहरामध्ये एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत ३० किलो मीटरच्या भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम आणि महापालिकेच्या विद्युत विभागाचे अनागोंदी काम यावर मंगळवारी झालेल्या सभेत प्रशासनावर टीकेची झोड उठवण्यात आली. महावितरणने महापालिकेच्या अनुमतीशिवाय  काम सुरू  केल्याबद्दल आजच्या सभेत सदस्यांनी महापालिका प्रशासनाने महावितरण आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली. तर, ठेकेदारावर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी अन्य एका चर्चेवेळी दिले.

महापालिकेची सर्वसाधारण सभा शाहू सभागृहात पार पडली. यावेळी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत शहरात भूमिगत वाहिनी टाकण्यासाठी महावितरणसोबत सामंजस्य करार करण्याच्या ठरावावर सविस्तर चर्चा झाली. गटनेते शारंगधर देशमुख यांनी ठेकेदाराने महासभेमध्ये ठराव मंजूर होण्यापूर्वी काम केले आहे,  त्यावर काय कारवाई करणार हे प्रशासनाने स्पष्ट करावे अशी मागणी केली. भूपाल शेटे यांनी विद्युत वाहिन्यामुळे रस्त्याचे होणारे नुकसान भरून निघणार नाही. ठोस उपाययोजना करून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

प्रतापसिंह जाधव यांनी दुधाळी येथे गटार स्वच्छ करताना एका कामगाराला विजेचा धक्का बसला याला जबाबदार कोण ते सांगावे,  असा प्रश्न प्रशासनाला केला. प्रा. जयंत पाटील जयंती नाल्याच्या ठिकाणी उच्च दाबाच्या भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या कामात महावितरणने  उच्च दाबाची विद्युतलाईन नाल्याजवळ वरील बाजूने टाकली असल्याने कारवाईची मागणी केली. यावर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी संबंधित ठेकेदार दंड भरण्यास तयार असल्याचे सांगितले. आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी ठेकेदारावर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करू असे सांगितले.

दोन दिवसांत पथदिवे लावण्याचे आदेश

महापालिका हद्दीतील पथदिव्यांना एलईडी दिवे बसविण्यासाठी ईईएसएल कंपनीसोबत करार करण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. यावेळी सदस्यांनी टय़ुबलाईट असताना अधिकाऱ्यांकडून उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे टय़ुबलाईट मिळत नसल्यावरून सदस्यांनी आक्रमक होत शहर अभियंत्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत चांगलेच धारेवर धरले. महापौर शोभा बोन्द्रे यांनी दसरा आणि दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर दोन दिवसांत पथदिवे लावून घ्यावेत असे आदेश प्रशासनाला दिले.