गेल्या वर्षी आलेला महापूर त्याचबरोबर या वर्षीचा पाऊस यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. करोनाचे संकट आल्याने रस्त्यांची कामे करता आली नाहीत. आता मात्र ८ नोव्हेंबपर्यंत शहर खड्डेमुक्त करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

पाटील यांनी महापालिकेच्या विकासकामांसंबंधी आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. करोनामुळे महापालिकेची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता असून महापालिकेवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही होईल, असेही ते म्हणाले.

शहरात सध्या दोनशे टन कचऱ्याची निर्गत होत असून कचरा निर्गतीकरणाची क्षमता पन्नास टनाने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच अडीचशे टनापर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. काळम्मावाडी नळपाणी योजनेचे पाणी चार महिन्यांमध्ये शहरवासीयांना मिळेल.