कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी पोलिसांनी बुधवारी आंतरराज्य अट्टल घरफोड्यास शिताफीने अटक करून साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. परशराम नाना गोंदाडकर (वय ३१, कल्लेहोळ, ता. जि. बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून मागील वर्षभरातील १३ घरफोड्या उघडकीस आल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी गडहिंग्लज येथे दिली. पोलिस उपअधीक्षक अनिल कदम व तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार उपस्थित होते.

गेल्या वर्षभरात नेसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले होते. असाच गुन्हा २ फेब्रुवारी रोजी घडला. त्या अनुषंगाने तपास सुरू केला असता कोवाड येथे दुचाकीवरून टेहळणी करताना एक व्यक्ती पोलिसांना दिसून आली. अंगझडती घेतली असता त्याच्याकडील पिशवीमध्ये चांदीचे दागिने, मोबाईल व कटावणी आढळून आली. अधिक माहिती घेतली असता त्याने तारेवाडी तसेच चंदगड हद्दीतील कागणी, तुर्केवाडी, करंजगाव, हेरे, चंदगड, मांगलेवाडी, धामापूर तर आजरा तालुक्यातील परोलीवाडी, गवसे, पेरणोली, सुलगाव येथे घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. त्यातून सहा लाख नव्वद हजार रुपयांचे दागिने जप्त केले. यापूर्वी त्याच्यावर खडेबाजार (बेळगाव) येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.