कोल्हापूर : कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत निघाली असली तरी पोलिसांच्या लाठीमारमध्ये तीन कार्यकर्ते जखमी आणि महापौर शोभा बोंद्रे यांना धक्काबुक्की यामुळे गालबोट लागले .

मिरवणुकीत पुढे जाण्याच्या कारणावरून जोतिबा रोड कॉर्नर येथे प्रॅक्टिस क्लब या मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली. त्यात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारल्याने पोलिसांनी लाठीमार केला.

त्यात या मंडळाचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. सौरभ हारूगले, नीरज ढोबळे, विनय क्षीरसागर अशी जखमी कार्यकर्त्यांंची नावे आहेत. या प्रकारामुळे मिरवणूक थांबली. कार्यकर्त्यांचा प्रक्षोभ आणि नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी अखेर दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मिरवणुकीस पुन्हा रात्री पावणे नऊ च्या सुमारास प्रारंभ झाला.

गणेश विसर्जन मिरवणुकीला कोल्हापूरचा मानाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीच्या पूजन झाल्यानंतर पोलीस सुरक्षा रक्षकांनी महापौर शोभा बोन्द्रे आणि उपमहापौर महेश सावंत यांना धक्काबुक्की केली. मिरवणुकीच्या सुरवातीलाच हा प्रकार घडल्यामुळे काही काळासाठी परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

महापौरांनी या घटनेचा निषेध केला. या पुढे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी  होण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल , असे  त्या म्हणाल्या.