17 December 2017

News Flash

प्रतिमा सुधारण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचा उपक्रम

कोल्हापूर पोलिसांची कामगिरी बघितल्यावर वेगळा अर्थ काढला जातो.

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: October 12, 2017 1:49 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कायद्याचे रक्षकच भक्षक होऊ लागले, कर्तव्यच्युती करून गुन्हेगारांशी संगनमत साधू लागले, लाचखोरीच्या उच्छाद मांडला, भर रस्त्यात तळीरामाला लाजवेल अशी कृत्ये करू लागला ..अशा एक ना अनेक गरव्यवहारांच्या कृत्यामुळे कोल्हापूर पोलिसांची प्रतिमा काळवंडली आहे. त्यांच्या अगाध लीला पाहून ‘हे पोलीस आहेत की दरोडेखोर’ असा खडा सवाल करण्यापर्यंत जनतेकडून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. याचा गांभीर्यपूर्वक विचार करून कोल्हापूर पोलीस दलाने शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यातून गेल्या २१ महिन्यांत ३५ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस खात्याचे काम कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे, पण कोल्हापूर पोलिसांची कामगिरी बघितल्यावर वेगळा अर्थ काढला जातो. वारणानगर येथील कोटय़वधी रुपयांच्या लूट प्रकरणांत तर फसवणूक, अपहरण, खंडणी, दरोडा यासह इतर गुन्हे पोलीस अधिकारी आणि शिपायांवर दाखल करण्याची वेळ कोल्हापूर पोलिसांवर आली ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या कोल्हापूर पोलीस दलातील अपप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलिसांना लाचखोरीसह गरवर्तनाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे समाजातून टीकेचा भडिमार सुरू झाल्यावर आता पोलीस दलाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून गेल्या २१ महिन्यांत ३५ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय चोरटय़ांशीच संगनमत करून गुन्हे करणारे पोलीसही कारवाईच्या फेऱ्यात सापडले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेला हा पवित्रा पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यास कारणीभूत ठरेल, अशी अपेक्षाही यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.

लाचखोरीचा कलंक

२०१६ या वर्षांत मध्ये जिल्ह्य़ातील २३ पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली. यातील ११ पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. काही पोलीस वरिष्ठांच्या इशाऱ्याने वरकमाई करण्यात गुंतले असून ही अपप्रवृत्ती वाढत आहे. पोलीस ठाण्यात जादा कलेक्शन करणारा कोण, तो त्या ठाण्याचा ‘कलेक्टर’ बनतो, हे वास्तव आहे. अधिकारीच या गोष्टीला खतपाणी घालत असल्याचे उघडपणे बोलले जाते. दुसरीकडे, लाचलुचपत प्रतंबिधक विभागाच्या कारवाईत रंगेहाथ सापडल्यानंतरही काही पोलिसांमध्ये सुधारणा होत नाहीत.

गेल्या दोन वर्षांत पोलीस अधीक्षकांसारख्या वरिष्ठ अधिकारयांच्या कडक भूमिकेमुळे गरवर्तन करणारे आणि लाचखोर पोलिसांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. १२ पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली आहे. यंदा सप्टेंबरअखेर १२ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यातील पाच पोलीस लाच घेताना सापडले, तर सात पोलिसांनी कामचुकारपणा केला आहे. निलंबनाची कारवाई झालेल्या पोलिसांची सहा महिन्यांत विभागीय चौकशी केली जाते. या चौकशीदरम्यान संबंधितांवर आरोपांची सखोल तपासणी करून त्याच्यावर कारवाई होते. सक्तीची रजा, पगारवाढ रोखणे, आíथक दंड अशी शिक्षा दिली जाते. लाचखोरीच्या घटनांमध्ये थेट न्यायालयात आरोपपत्र दाखल होते.

खून, दरोडय़ातील आरोपी विशाल ऊर्फ भीमराव पवार याला उपचारासाठी दाखल केले असता, तो पोलिसांची नजर चुकवून बेडीतून हात काढून पळाला. या वेळी बंदोबस्तावर असलेले साहाय्यक फौजदार दिनकर कवाळे आणि कॉन्स्टेबल सचिन वायदंडे या दोघांनाही पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले. दीड महिन्यांपूर्वी गगनबावडा येथे मद्यप्राशन करून एका रुग्णालयात धिंगाणा घालणारे इजाज शेख, प्रवीण काळे आणि अमर पाटील यांच्यावरही कारवाई झाली. याशिवाय लाच घेणारे आजरा पोलीस ठाण्यातील जे. डी. जाधव, राजारामपुरीतील किरण गवळी आणि जुना राजवाडय़ातील पंडित पोवार यांचेही निलंबन झाले. या कारवायांमुळे पोलिसांमधील लाचखोरी आणि गरप्रकार वाढल्याचे स्पष्ट होत आहे. कारवाई करण्याची वेळ येऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे अशा स्पष्ट सूचना वरिष्ठांनी दिल्यानंतरही पोलिसांकडून चुकीची कृत्ये होतात ही गंभीर बाब आहे.

अधिकारीही गंभीर गुन्ह्य़ात

वारणानगर येथे शिक्षण संस्थेच्या इमारतीतील कोटय़वधींची रक्कम लुटण्यात सांगलीतील पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. यातील पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट सध्या सीआयडीच्या अटकेत आहे. याशिवाय पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत संशयित आरोपीच्या मृत्यूप्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. कराड येथील अशाच गुन्ह्य़ातील पोलीस निरीक्षक विकास धस अद्याप फरार आहे.

‘पोलीस कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न’

शासनातील अन्य विभाग आणि पोलीस दल यांच्यातील कारवाईच्या कायदेशीर बाबीत लक्षणीय फरक आहे. पोलीस दलात शिस्त महत्त्वाची असल्याने कारवाईचे स्वरूपही तितकेच गंभीर असते. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचा जसा प्रयत्न असतो तसाच दलातील कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून गरकृत्य होणार नाही याबाबत आम्ही दक्ष आहोत, असा निर्वाळा कोल्हापूर पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिला. पोलीस निलंबनाचे प्रकार वाढले असले तरी कोणत्या कारणातून कारवाई झाली आहे याच्या तपशिलालाही महत्त्व आहे, असेही त्यांनी नमूद केले.

 

First Published on October 12, 2017 1:49 am

Web Title: kolhapur police new activities to improve image