कोल्हापुरात पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. खुनाची शिक्षा भोगून परतल्यानंतर, आपली दहशत कायम रहावी यासाठी एका टोळक्याने लक्ष्मीपुरी भागात हैदोस घातला. टोळक्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दोन जणं जखमी झाले असून, पोलिसांत फिर्याद नोंदवल्यानंतर शिक्षा झालेल्या दोघांसह 9 जणांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लक्षतीर्थ वसाहत परिसरात राहणारे, अमीन इब्राहीम शेख, संदीप रघुनाथ पाटील, नदीम नायकवडी, इब्राहिम शेख, रफिक पठाण, दिगंबर पाटील, भाऊ पाटील, सचिन पास्ते आणि एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या हल्ल्यात राकेश कोळी आणि ऋषिकेश खोदल हे दोन तरुण जखमी झालेले आहेत. 2010 साली फिर्यादी मनोरमा मिसाळ यांचे दीर मंगेश मिसाळ यांचा खून झाला होता. याप्रकरणात अमीन इब्राहिम शेख व संदीप रघुनाथ पाटील यांना शिक्षा झालेली होती.

आज तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी परिसरात आपली व टोळीची दहशत ठेवण्यासाठी जमाव करुन लक्षतीर्थ वसाहत ते कमानी पर्यंत हातामध्ये तलवारी, कुऱ्हाड , काठ्या-दगड घेऊन दहशत माजवण्यास सुरुवात केली. रस्त्यावर फटाके फोडून आरोपींनी याच परिसरात कै. मंगेश मिसाळ यांच्या पुण्यतिथीनिमीत्त लावण्यात आलेले फ्लेक्स तलवारीने फाडून टाकले. या प्रकारात आरोपींनी दोघांच्या डोक्यात वार करुन त्यांना जखमी केलं तसेच एका चारचाकी वाहनावर दगडफेक करत तिचं नुकसानही केलं. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर या प्रकरणाचा तपास करत आहेत.