कोल्हापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच नागरिकांचा संपर्क वाढावा, हा उद्देश समोर ठेवून पोलिसांची सायकल गस्त हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. मुंबई पाठोपाठ कोल्हापुरात पोलीस सायकलवरून दिवसरात्र शहरात गस्त घालणार आहेत. या नवीन गस्तीचा प्रारंभ पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते सोमवारी दसरा चौकातून झाला.

चाळीस वर्षांपूर्वी पोलीस सायकलवरून गस्त घालत होते. त्यानंतर सायकलची जागा दुचाकीने घेतली. सध्या पोलीस दलात दुचाकी व चारचाकीमधून पोलीस दिवसरात्र गस्त घालत असतात. अशा वेळी एखाद्या कॉलनीत चोरटा शिरला असेल तर वाहनाच्या आवाजाने तो लपून बसतो. ते निघून गेल्यानंतर चोरी करून तो पसार होतो. अशा वेळी आवाज न होता पोलीस शहरात, उपनगरांत सर्वत्र फिरू लागले तर त्यांना चोरटे दिसून येतील आणि होणाऱ्या घरफोडय़ा वाचतील, असा उद्देश समोर ठेवून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शहरात पोलिसांना सायकलवरून गस्त घालण्यास सक्ती करा, असे आदेश पोलीस अधीक्षक मोहिते यांना दिले.

त्यानुसार त्यांनी ३५ सायकली खरेदी केल्या आहेत. दिवसा व रात्री ठराविक वेळेत हे पोलीस शहरात गस्त घालणार आहेत. प्रत्येक पोलिसाला क्रमवार पद्धतीने ही गस्त सायकलवरून घालावी लागणार आहे. शहरात राजारामपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, करवीर अशी पाच पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यास पाच सायकली देण्यात आल्या आहेत. या सायकलवर पुढे ‘कोल्हापूर पोलीस’ नावाची पाटी आहे. त्यानंतर प्रत्येक सायकलवर संबंधित पोलीस ठाण्याचे नाव आहे. प्रदूषणमुक्त, इंधन बचत, आरोग्यास लाभदायक असा या सायकल गस्तीचा फायदा पोलिसांना होणार असल्याचा दावा पोलीस अधिकारी करत आहेत.

कौतुकही अन् खिल्लीही

पोलिसांची सायकल गस्त हा नवीन उपक्रम समाजमाध्यमात चच्रेला कारणीभूत ठरला आहे. त्याचे स्वागत केले जात आहे. याच वेळी त्याची खिल्लीही उडवली जात आहे. चोर दुचाकी, मोटारीतून धूम ठोकणार आणि पोलीस सायकलवरून त्याचा पाठलाग करणार, असे चित्र रंगवत या विसंगतीवर खुमासदार भाष्य केले जात आहे. काही अधिकाऱ्यांना ही खिल्ली जिव्हारी लागल्याचे सांगितले जाते.