भाजप आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शह देण्याकरिता कोल्हापूरमध्ये वेगवेगळी समीकरणे आकारास येत आहेत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन भाजपला रोखण्याची व्यूहरचना आखली  जात असून, राजकारणात ‘कोल्हापूर पॅटर्न’ अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

हसन मुश्रीफ – सतेज पाटील ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आमदार जोडगोळी शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सहप्रमुख संजय मंडलिक यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्याच्या आणाभाका घेत आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना भाजपचे वेध लागले असून, ते बहुधा कमळाचा आधार घेतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचवेळी हातकणंगले मतदारसंघात शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी दोन्ही काँग्रेसचा मत्रीचा मळा अंकुरत असताना त्यांच्याविरोधात कोण याचा शोध अद्याप विरोधी पातळीवर सुरू आहे. या साऱ्या घडामोडींतून ठाणे जिल्ह्य़ातील शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील आघाडीचा ‘ठाणे पॅटर्न कोल्हापुरात आकाराला येत असून ही पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड मानली जात आहे. हे आव्हान मोडून काढण्याचे मोठे आव्हान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आहे.

राजू शेट्टी कोणाबरोबर?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही नवी समीकरणे पुढे येत आहेत. शासनाच्या प्रतिसादावर नाखूश असलेले शेट्टी हे त्यांचे जुने मित्र सदाभाऊ खोत यांना राज्यातील भाजपाची मंडळी जवळीक साधत असल्याने आणखीनच नाराज झाले. परिणामी, शेती आणि शेतकरी प्रश्नांवर शासन निष्क्रिय असल्याचा आरोप करत शेट्टी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम ठोकला.  शेट्टींनी मोदींपासून फडणवीसांपर्यंत नावानिशी आक्रमक भाषेत हल्लाबोल सुरू ठेवला. देशातील दीडशेवर शेतकरी संघटना देशाच्या राजधानीत एका मंचावर आणून सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यापर्यंत शेट्टी यांनी मजल मारली.

स्वाभाविकच त्यांच्या विरोधाचा फायदा घेण्याचे गणित विरोधी गोटात सुरू झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शेट्टी यांच्या गावात जाऊन भेट घेतली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कृषी प्रदर्शनाला शेट्टी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करून सलगी वाढवली आहे. दुसरीकडे काँग्रेसवर नाराज असलेले काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीपासून शेट्टींशी वाढवलेला दोस्ताना त्यांच्या जवाहर साखर कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी समारंभाला शरद पवार यांच्या जोडीने निमंत्रित करण्यापर्यंत कायम ठेवला. शेट्टी यांच्याशी सदैव शाब्दिक वाद घालणारे मुश्रीफ यांचाही राग एव्हाना मवाळ  झाला आहे. उलट त्यांनी गेल्याच आठवडय़ात साखर कारखानदारीचे प्रश्न सोडवण्यासाठी शेट्टी यांना आवाहन केले आहे. शेट्टी यांनीही परिस्थिती ओळखून आपला मार्ग काहीसा बदलला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून रान उठवतानाच त्यांनी थेट संसदेत साखर कारखानदारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत सहकार- साखरसम्राटांसोबत साखरपेरणी सुरू ठेवली आहे.  शेट्टींना पराभूत करण्याचा निर्धार भाजपकडून केला असला तरी त्यांच्या विरोधात उमेदवार कोण याचा निर्णय अद्याप झाला नाही. वेगवेगळ्या नावाची चर्चा केली जात आहे. सदाभाऊ खोत, विनय कोरे, भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्यापासून ते शेट्टींचे एकेकाळचे उजवे हात समजले जाणारे शिवसेनेचे शिरोळचे आमदार उल्हास पाटील अशी मोठी नामावली पुढे येत आहे. मुश्रीफ यांनी महाडिक यांना शह द्यायचा असला तरी यावर शरद पवार मौन राखून आहेत. खुद्द महाडिक यांनीही घडय़ाळाचे काटे फिरवणार असल्याचे सूतोवाच केलेले नाही. मंडलिक यांच्यावर टीका करणाऱ्या महाडिकांनी अजूनही मुश्रीफ यांच्यावर तोफ डागलेली  नाही.

संघर्षांचा त्रिकोण

खासदार धनंजय महाडिक यांची दिल्लीतील कामगिरी प्रभावी ठरत असताना गल्लीत मात्र बिनसत चालले. प्रारंभी त्यांनी विजयाचे श्रेय पक्षाचे ज्येष्ठ आमदार हसन मुश्रीफ यांना दिले. तद्वतच, वैरभाव विसरून मत्रीचा हात पुढे केलेल्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनाही धन्यवाद दिले. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात ‘मुन्ना-बंटी’ या मित्रांचा डंका पुन्हा वाजणार याची चुणूक दिसू लागली. पण, थोडय़ाच काळात मत्रीत विरजण पडले . सहा महिन्यातच मुन्ना ऊर्फ धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत तत्कालीन गृह राज्यमंत्री बंटी ऊर्फ सतेज पाटील यांच्याविरोधात चुलत बंधू अमल महाडिक यांना निवडून आणले. येथून पुढे  मुन्ना-बंटी यांच्यात सुरू झालेल्या शत्रुत्वाला फुटलेली उकळी  अलीकडच्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या राजकारणापर्यंत तापतच चालली आहे. इथे महाडिक यांना एका सोबत्यांनी साथ गमावली. नंतर मुश्रीफ-महाडिक यांच्यात सुप्त वादाचा खेळ सुरू झाला. महाडिक हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी अधिक जमवून घेत आहेत , अशी मुश्रीफ यांची धारणा झाली. याच्या तक्रारी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापर्यंत पोहचल्या. तरीही काहीच हालचाली झाल्या नसल्याने मुश्रीफांनी मंडलिकांशी जमवून घ्यायला सुरुवात करत महाडिक यांना शह देण्यास सुरुवात केली आहे.

महाडिक यांची चाचपणी

चंद्रकांत पाटील यांच्याशी एकूणच महाडिक कुटुंबीयांचे मधुर संबंध आहेत. पण लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असेल तेव्हा वारे कोणाच्या दिशेने वाहत  आहे, याचा अदमास घेऊन कोणाकडून लढायचे याचा निर्णय महाडिक घेतील असे त्यांच्या हालचाली पाहता दिसत आहे. शेट्टी-मंडलिक यांच्याशी मत्र जमवण्यात सतेज पाटील यांचा पुढाकार आहे, पण काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील यांनीही या विषयावर तसेच काँग्रेसचा उमेदवार िरगणात असणार की नाही याबद्दल काहीच मत मांडलेले नाही.