साडेतीन शक्तिपीठापकी एक असणाऱ्या श्री अंबाबाईचा नवरात्रोत्सव मंगळवारी सुरू होत आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून महालक्ष्मीचे ऐतिहासिक मंदिरही लक्ष दिव्यांनी उजळून गेले आहे.
कोल्हापुरातील नवरात्रोत्सव अत्यंत वैशिष्टय़पूर्ण असतो. देवीचा थाट, वैभव, तिची साजशृंगारातील पूजा, तिचा नवेद्य हे सारं पाहण्यासाठी देशभरातून भाविक येथे येत असतात. लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. सुवर्णालंकारांनी मढलेल्या देवीच्या दर्शनाने तृप्त होतात. याच पाश्र्वभूमीवर देवीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख यांनी उत्सव तयारीचा आढावा घेतला आहे. वाहतूक नियोजन, सुरक्षा, दर्शनरांग, प्रसाद आदींचे नियोजन पूर्ण झाले आहे. उत्सवासाठी संपूर्ण करवीरनगरी सज्ज झाली आहे. सायंकाळपासून मंदिरातून मशाल प्रज्वलित करून ती गावोगावी नेण्यासाठी तरुणांची गर्दी झाली होती.