कोल्हापूर जिल्ह्यात रात्री नंतर पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झालली आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा वेग वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी धरणांमधील पाणीसाठा मध्ये वाढ होत चालली असून महापुराच्या धोकाही वाढला आहे. धरणक्षेत्रासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात रात्रीपासुन प्रचंड पाऊस सुरू आहे, धरणेही ओसंडून वाहू लागल्याने कोल्हापूर जिल्हयातील पुरस्थिती अजुन बिकट होण्याचा धोका आहे.

राधानगरी धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्याचबरोबर मेन गेट या सर्वांच्या मधुन ७००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालु आहे. त्यामुळे पंचगंगा नदी धोका पातळीवर वाहत आसल्यामुळे त्या पाण्याची फुग पाठीमागे भोगावती नदीवरती येणार असून नदीकाठावरील सर्व गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नदीकाठावरील गावातील पोलीस पाटील,सरपंच, तलाठी ग्रामसेवक, कोतवाल यांनी आपल्या गावातल्या पुरबाधीत कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवावे,असे आवाहन पंचायत समिती राधानगरी यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असल्याने पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, ‘एनडीआरएफ’च्या कोल्हापूरात दोन, शिरोळ तालुक्यात दोन आणि सांगली जिल्ह्य़ात दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यातील स्थानिक प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थांना सर्व साधनांसह सतर्क ठेवण्यात आले आहे. आजरा तसेच कोवाडमधील नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मात्र, दुपारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्य़ातील परिस्थिती नियंत्रणात असून स्थानिक प्रशासन लक्ष ठेवून असल्याचे मदत आणि पुनवर्सन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.