27 February 2021

News Flash

आज अर्ज करा, लगेच परवाना न्या; कोल्हापूर आरटीओचा अभिनव उपक्रम

येथे दररोज नवीन परवान्यासाठी येणाऱ्या सुमारे १५० जणांना तसेच नुतनीकरणासाठी येणाऱ्या २०० जणांना त्याच दिवशी काम झाल्याचा प्रत्यय येणार आहे.

आरटीओ कार्यालयाचे प्रतिकात्मक छायाचित्र

सकाळी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात यायचे आणि जाताना वाहन परवाना घेऊन परतायचे. इतपत सोपी, गतिमान आणि अभिनव प्रशासकीय यंत्रणा कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गुरुवारपासून सुरु केली आहे. देशात प्रादेशिक स्तरावरील अशा प्रकारची क्रांतिकारी सेवा पुरवणारे देशातील पहिले प्रादेशिक परिवहन कार्यालय ठरले आहे. येथे दररोज नवीन परवान्यासाठी येणाऱ्या सुमारे १५० जणांना तसेच नुतनीकरणासाठी येणाऱ्या २०० जणांना त्याच दिवशी काम झाल्याचा प्रत्यय येणार आहे.

सरकारी कामाचा अनुभव बहुधा निराशाजनक ते संतापजनक असा असतो. ‘शासकीय काम अन् बारा महिने थांब’ या खाक्यामुळे सरकारी कार्यालयात खेटे मारून दमछाक होते. असा सर्वसाधारण अनुभव नेहमीच सर्वांना येत असतो. याला आता कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय अपवाद ठरले आहे. लालफितीच्या कामकाज पद्धतीवर या कार्यालयाने लाल शेरा मारला आहे .

कार्यालयात येणाऱ्या लोकांना कामासाठी तिष्ठत बसणे, काम होईपर्यंत काही आठवडे प्रतीक्षा करणे, प्रसंगी त्यासाठी सरकारी बाबूपासून ते मध्यस्थांचे हात ओले करणे अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागते. आता हा सारा मामला कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात निपटला जाणार आहे. कामासाठी यायचे आणि काम पूर्ण करून समाधानाने परतायचे अशी कामाची न्यारी पद्धत येथे प्रत्यक्षात सुरु झाली आहे.

राज्यात शून्य प्रलंबिततेचे (झिरो पेंडन्सी) ढोल जोराने वाजवले जात असले तरी सरकारी कार्यालयातील कूर्मगती अद्यापि पुढे सरकताना दिसत नाही. या कार्यालयाने त्याला कृतिशीलतेची जोड दिली आहे .

यापूर्वीच्या पध्दतीनुसार वाहन परवाना  पोस्टाने पाठविणे बंधनकारक होते. तथापि कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयास एका दिवसात वाहन परवाना थेट जनतेच्या हातात देण्याची परवानगी शासनाने प्रायोगिक तत्वावर दिली आहे. यासाठी आधारकार्ड हा ओळखीचा पुरावा पुरेसा ठरणार असून अन्य कागदपत्रांचे भेंडोळे घेऊन भटकंती करण्याची गरज उरली नाही.

या नव्या उपक्रमामुळे या कार्यालयात नवीन परवान्यासाठी येणाऱ्या सुमारे १५० जणाना तसेच नुतनीकरणासाठी येणाऱ्या २०० जणांना परवान्याची प्रक्रिया पूर्ण करुन परवाना एका दिवसातच दिला जात आहे. गुरूवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्या हस्ते घेण्यात आलेल्या ड्रायव्हिंग टेस्ट वाहनधारकांना परवाना देवून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

वाहन क्रमांकही त्याच दिवशी

कोल्हापूर येथून वाहन खरेदी करणाऱ्या वाहन मालकांना एका दिवसातच वाहनाचा क्रमांक उपलब्ध करुन दिला जात आहे, तर कॅम्पमध्ये (शहर सोडून इतरत्र भरणारी शिबिरे) वाहन खरेदी करणाऱ्यांना दुसऱ्या दिवशी वाहन क्रमांक दिला जात आहे .

कॅम्पच्या संख्येत दुप्पट वाढ
या कार्यालयाने ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कॅम्पची संख्या २२ वरुन आता ४० अशी जवळपास दुप्पट केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 7:28 am

Web Title: kolhapur rto implement innovative scheme for licence and vehicle passing process
Next Stories
1 कोल्हापूरची विमान सेवा दोन महिन्यांतच बंद
2 कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनात चौपट वाढ
3 राजर्षी शाहू महाराजांची कोल्हापुरातच उपेक्षा
Just Now!
X