News Flash

“राज्य शासनाची दूधखरेदी म्हणजे आपल्याच पोळीवर तूप ओतून घेण्याचा प्रकार”

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा आरोप

(संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर

करोना काळात दुध उत्पादकांना आधार म्हणून राज्यशासन दूध खरेदी करीत असले तरी हा आपल्याच पोळीवर तूप ओतून घेण्याचा प्रकार आहे. राज्यातील केवळ १० तालुक्यातून दूधाचं संकलन केले जाते. यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, सुनील केदार यांच्या संघातून दूध खरेदी केले जाते, असा आरोप माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी केला.

१ ऑगस्टच्या पूर्वी दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा गावांगावातील दूध डेअरीसमोर हातात बॅनर घेऊन आंदोलन करणार आहोत. रस्त्यावर दुधाची वाहने आली तर ती परतवून लावू, असा इशारा आमदार खोत यांनी दिला.

ठाकरे सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

पत्रकारांशी बोलताना खोत म्हणाले की, राज्यात सहकाराच्या माध्यमातून २४ टक्के दूध संकलन केले जाते. तर खासगीच्या माध्यमातून ७६ टक्के दूध संकलन होते. या सहा महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाची नासाडी झाली, पण सरकारकडून कोणतीही बाजारपेठ उभी केली नाही. दूधाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना समजत नाही किंवा समजूनही ते मुक्या-बहिऱ्यासारखे करत आहेत, असा टोला खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांना लगावला.

केंद्रावरील आरोप निराधार

दूध भुकटी परदेशातून आयात केल्याने उत्पादकांना फटका बसला असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करतात, पण केंद्राने एक किलो भुकटी परदेशातून आयात केली नाही कि आयात करण्यास परवानगी दिली नाही. दूध उत्पादकांचा आवाज सरकारपर्यंत पोहचला नाही का? असा सवाल करून खोत यांनी या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत,असा आरोप केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 7:23 pm

Web Title: kolhapur sadabhau khot slams thackrey government regarding milk issues vjb 91
Next Stories
1 ‘स्वबळावर लढू, पण सत्तेसाठी शिवसेनेबरोबर राहू’
2 तेव्हा भाजपची मंडळी कुठे लपून बसली होती?
3 फडणवीसांची साखरपेरणी पवारांना शह देण्यासाठीच?
Just Now!
X