एरवी राजकीय – सामाजिक कार्यात व्यस्त असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोल्हापूरकरांना कुटुंबवत्सल भूमिकेत वावरताना दिसत आहेत. घरगुती नातेसंबंध जोपासत शरद पवार दोन दिवस निकटच्या नात्यातील विवाह सोहळ्यात वडिलकीच्या भूमिकेत लीलया वावरत आहेत. या लग्नसोहळ्यात ते पवार- जाधव कुटुंबातील नातेसंबंधांची तरलता सांभाळताना दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे अनेकदा कोल्हापूरला येतात. काहीवेळा ते येथील नातेवाईकांच्या घरगुती कार्यक्रमांनाही आवर्जून हजेरी लावतात. राजकारणात पवार यांची ताकद वाढत असली तरी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नातेवाईकांशी जवळकीचे नाते जपले आहे. अगदी, मामाच्या गावाला सवड काढून जाऊन येण्याइतपत ग्रामस्थांशी जिव्हाळा ठेवला असल्याचे अलीकडे दिसले होते. यावेळी मात्र ते नातेसंबंधातील वीण आणखी घट्ट करीत असताना दिसत आहेत. त्याला कारणही तसे भावनात्मक आहे.
शरद पवार हे इंदूरचे सदुभाऊ शिंदे यांचे थोरले जावई असून शिंदे यांना चार कन्या आहेत. यातील थोरल्या प्रतिभाताई यांचा विवाह शरद पवार यांच्याशी झाला. तर शिंदे यांच्या धाकटी कन्या गीताताई यांचा विवाह कोल्हापुरातील रणजित जाधव यांच्याशी झाला. जाधव हे व्यववसायिक होते. शरद पवार यांचे साडू असूनही ते सामाजिक, राजकीय घडामोडीपासून चार हात लांब होते.

काही वर्षांपूर्वी रणजित जाधव यांचे निधन झाले. त्यांचे चिरंजीव आदित्य हे शरद पवार यांच्या मर्जीतले. अगदी पुत्रवत. आदित्य यांचा विवाह शुक्रवारी कोल्हापुरातील फौंड्री उद्योजक शिरीष सप्रे यांच्या कन्या राजसी हिच्याशी होत आहे. या विवाह सोहळ्याला केवळ हजेरी न लावता शरद पवार हे वडीलकीच्या नात्याने या समारंभात वावरत आहेत.

रणजित जाधव यांच्या निधनाने जाधव कुटुंबाला आधार देण्याचे काम पवार करीत आहेत. पवार ,जाधव,शिंदे कुटुंबातील थोरलेपणाची जबाबदारी ते कर्त्यव्यभावनेने निभावत आहेत. विवाह समारंभ (शुक्रवार) आणि दुसऱ्या दिवशी (शनिवार) होणारा स्वागत समारंभास अशा दोन्ही कार्यक्रमात पवार हे राजकीय वस्त्रे बाजूला सारून साऱ्या नातेवाईकांसोबत वावरत आहेत.

हा विवाह सोहळा नेटकेपणाने पार पडावा यासाठी त्यांनी पहिल्या दिवशी (शुक्रवार) कसलेही राजकीय, सामाजिक कार्यक्रम स्वीकारलेले नाहीत. तर, दुसऱ्या दिवशी त्यांनी फक्त रयत शिक्षण संस्थेचे शैक्षणिक कार्यक्रम स्वीकारले आहेत. यातून पवार हे वडीलकीच्या नात्याने हा विवाह सोहळा आस्थेवाईकपणे पार पाडताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे केवळ शरद पवार हेच नव्हे तर अवघे पवार कुटुंबीय या सोहळ्याला आवर्जून हजर आहेत. प्रतिभाताई पवार,जावई सदानंद सुळे, त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पवार, शिंदे कुटुंबातील बहुतेक सर्वमंडळी कोल्हापुरात आली आहेत.