कोल्हापुरात शिवसेनेचा विक्रेत्यांना इशारा

कोल्हापूर : मटण दरावरून इतिहासात पहिल्यांदा आंदोलन भडकू नये असे वाटत असेल,तर मनमानी दरवाढीतून सुरू असलेली ग्राहकांची लूट थांबवावी,अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा  शिवसेनेकडून निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ  गलांडे यांना बुधवारी निवेदन देऊ न ही मटण दरवाढ रोखण्याची मागणी केली.

शहरात गेल्या महिना दोन महिन्यापासून मटन विक्रेत्याकडून अचानकपणे मटण प्रतिकिलो ५६० ते ६०० रुपयाने विक्री करण्यात येत आहे. बकऱ्यांचा तुटवडा आणि दूरवरून बकरे आणावे लागत असल्याने ही दरवाढ असल्याचे काही मटण विक्रेत्यांकडून सांगण्यात येत होते.

दरामुळे कसबा बावडा येथील तरुण मंडळाच्या पुढाकारातून बैठक घेऊ न,जाणीवपूर्वक कृत्रिम दरवाढ करणाऱ्या अशा प्रवृत्तींना चाप लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या दरवाढीवर कोणाचेच नियंत्रण नाही, महानगरपालिका प्रशासन,अन्न व औषध भेसळ प्रतिबंधचे अधिकारी व जिल्हा प्रशासन देखील याविरोधात हस्तक्षेप करत नियंत्रण ठेवत नाहीत. यामुळे सर्वसामान्यांना फटका बसत असल्याचे सांगून,नैसर्गिक दरवाढ समजू शकतो. पण मटणाच्या बाबतीत ही मनमानी दरवाढ असून, ग्राहकांची अक्षरश: पाकीटमारी चालू असल्याचा आरोप शिवसेना  जिल्हा प्रमुख व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी यावेळी केला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून,या दरवाढी बद्दलची माहिती घेऊ न,एक संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन गलांडे यांनी दिले. माजी आमदार सुरेश साळुंखे,सुजित चव्हाण,शिवाजी  जाधव, हर्षल सुर्वे,अवधूत साळोखे,दत्ता टिपूगडे, शशिकांत बिडकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.