कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाल्यानंतर शेतकरी संघटनेने ऊस वाहतूक रोखण्यास सुरुवात केल्याने शनिवारी साखर कारखाना प्रतिनिधी आणि लोक प्रतिनिधींची तातडीची बैठक होऊन समन्वयाची तयारी दर्शवली. त्यानुसार रविवारी पाच प्रमुख साखर कारखान्याचे प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेणार आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामाचे ऊस दराचे गुऱ्हाळ आता सुरु झाले असून यावर कोणता मार्ग निघतो हे लक्षवेधी ठरले आहे.

या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्याचे ऊस गाळप सुरू झाले आहे. डी.वाय.पाटील साखर कारखाना, सेनापती संताजी घोरपडे कारखान्याने ऊसदर जाहीर न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांची ऊस वाहतूक रोखली आहे. दुसरीकडे,स्वाभिमानीची ऊस परिषद २३ तारखेला होणार असून या परिषदेत ऊसदर मागणीची घोषणा होणार आहे. या वादात ऊस गाळप अडकल्याने शनिवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत साखर कारखाना प्रतिनिधी यांची बैठक झाली.

खासदार संजय मंडलिक, बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आवाडे,माजी आमदार के.पी.पाटील, गणपतराव पाटील, माधवराव घाटगे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर आमदार मुश्रीफ व आवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुश्रीफ म्हणाले,राज्यात सरकार स्थापन झाले नसल्याने मंत्रिगटाची बैठक झालेली नाही. त्यामुळे कारखान्यांना गाळप परवाने मिळालेले नाहीत. त्यातच काही कारखान्यांची आर्थिक स्थिती वाईट असली तरी कायदयनुसार एफआरपी द्यावी लागणार आहे. ती कशी द्यायची यावर चर्चा करण्यासाठी रविवारी साखर कारखाना आणि स्वाभिमानीचे प्रतिनिधी यांच्यात संयुक्त बैठक होणार आहे. आवाडे म्हणाले, महापुरामुळे उसाची कमी उपलब्धता, उताऱ्यात घट, कमी गाळप या अडचणी निर्माण झालेल्या असल्याने त्याचा शेतकरी संघटनेने विचार केला पाहिजे.