सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल खोटी माहिती प्रसारित करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी कोल्हापूर भाजपाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे शुक्रवारी एका निवेदनाद्वारे केली.

‘जिल्हाधिकारीसाहेब गुन्हा दाखल करा – एक कोल्हापूरकर’ अशा आशयाचा एक संदेश चंद्रकांत पाटलांविरोधातील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदेशामध्ये चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी घेतली होती का? त्यांची तपासणी कुठे झाली? असे प्रश्न विचारून लोकांमध्ये नाहक शंका निर्माण करण्याचा आणि त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.

राज्यात करोनाने थैमान घातले असताना राज्य सरकार निद्रावस्थेत आहे, अशा परिस्थितीत चंद्रकांत पाटील राज्याच्या विविध भागात जाऊन आढावा घेत असून रुग्णांची चौकशी करीत आहेत. त्यांचे काम विरोधकांच्या पचनी न पडल्यामुळे जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अशा खोट्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवणाऱ्या लोकांना त्वरीत शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाच्यावतीने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.