आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर महाआरती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : शिक्षकदिनी शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, या मागणीसाठी कोल्हापुरात शिक्षकांना रस्त्यावर उतरावे लागले. शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर महाआरती आंदोलन केले, तर याच वेळी भावी शिक्षकांनी शासनाने शिक्षक भरती करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले.

महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने शिक्षकदिनीच शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर महाआरती आंदोलन केले. प्रथम गणपतीची व नंतर सरकारच्या निषेधाची आरती करण्यात आली. या वेळी गणपतीने सरकारला बुद्धी द्यावी अशी घोषणाबाजी करण्यात आली. कृती समितीचे सचिव प्रकाश पाटील, उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, भरत रसाळे  यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. शिक्षकांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले, राज्यभरात विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या ४५ हजार आहे. सप्टेंबर २०१६ पासून सरकारने शाळांना २० टक्के अनुदान दिले. सध्या शाळा शंभर टक्के अनुदानासाठी पात्र आहेत. त्यांना पूर्ण अनुदान मिळाले पाहिजे यासाठी हा लढा सुरू आहे.

शिक्षणमंत्री विनोदतावडे यांनी निकषानुसार अनुदान देण्याचा निर्णय लवकरच घेऊ  असे आश्वासन दिले होते. हजारो शिक्षकांची वेठबिगारी थांबवण्यासाठी सरकारने तातडीने या बाबत सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे. येत्या महिन्याभरात या प्रश्नावर तोडगा काढला नाही तर महात्मा गांधी जयंतिदिनी आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

जिल्हा परिषदेसमोर उपोषण

शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम त्वरित जाहीर करावा, स्थानिक स्वराज्य संस्थेत खासगी अनुदानित संस्थांमधील सर्व रिक्त पदे एकाच वेळी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून भरण्यात यावीत, आगामी शिक्षक भरती पवित्र प्रणालीच्या माध्यमातून होत असताना केंद्रीय पद्धतीनेच भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, यासह अन्य मागण्यांकरिता डी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिक्षकदिनी येथील जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले . एकीकडे अभियोग्यता चाचणीच्या माध्यमातून उच्च गुण प्राप्त केलेले उमेदवार उपलब्ध असताना मोठय़ा प्रमाणावर शिक्षक पदे रिक्त ठेवून शासन शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान करत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करत असल्याचे संघटनेचे सदस्य सतीश कुंभार यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur teachers protest on road
First published on: 06-09-2018 at 02:08 IST