कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकात होणारा शाही सीमोल्लंघन सोहळा यंदा किमान गर्दीमध्ये होणार असल्याचे संकेत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिले. तर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिरात होणाऱ्या नवरात्र उत्सवाबाबत अद्याप संदिग्धता कायम आहे.

कोल्हापुरात नवरात्रोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिरात दररोज वेगवेगळ्या रूपातील पूजा बांधली जाते तसेच अन्य विधीही उत्साहात पार पडत असतात. ललिता पंचमीला करवीर निवासिनी व त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळाही भाविकांच्या अमाप उत्साहात पार पडतो. यंदा करोनाच्या परिस्थितीमुळं राज्यातील मंदिर बंद आहेत. तसेच आत्तापर्यंतचे सणउत्सव मर्यादित स्वरुपात साजरे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हा नवरात्र सोहळा साजरा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. मात्र, याबाबत अद्याप कसलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.

दरम्यान, आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नवरात्रोत्सव आणि दसरा साधेपणाने साजरा करावा असे आवाहन केले आहे. १७ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होणार असून २५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. दसरा चौकात विजयादशमी दिनी पारंपारिक उत्सवासाठी कमीत कमी गर्दी असावी, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.

तसेच हा नवरात्रोत्सव साजरा करताना आवाक्यात आलेली करोनाबाधितांची संख्या वाढणार नाही, याची काळजी घेण्यासाठी फिजिकल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.