सलग सुट्टय़ांमुळे कोल्हापूर जिल्ह्णातील पर्यटनस्थळे पर्यटकांच्या उपस्थितीने बहरून गेली आहेत. धार्मिक, गडकोट, वर्षां, निसर्ग अशा विविध प्रकारच्या पर्यटकांना ही स्थळे आपल्याकडे येण्यास भाग पाडत आहेत. त्याच्या मोहाने वेडावलेले पर्यटक सहकुटुंब भटकताना जागोजागी पाहायला मिळत आहे. करवीरनगरीत महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

पावसाने विश्रांती घेतल्याने पर्यटनासाठी उत्तम वातावरण आहे. श्रावण मासी निसर्गाची उधळण होऊन जिल्ह्णााच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात हिरवाईचे सौंदर्य खुलले आहे. या भागात पावसाच्या हलक्या, मध्यम सरी बरसत असल्याने त्यामध्ये चिंब होत निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावले याभागात वळली आहेत. पन्हाळा, विशाळगड, पारगड अशा गडावर सहकुटुंब गर्दी झाली आहे. बर्की, राऊतवाडी आदी धबधब्यामध्ये डुंबण्याचा आनंद लुटला जात आहे. अशा ठिकाणी होणारी हुल्लडबाजी लक्षात घेऊन पोलिसांची खास देखरेख पथके तनात झाली असून त्यांनी टारगटांच्या मुसक्या आवळल्या असल्याने सहकुटुंब पर्यटन सुलभ, निर्धोक बनले आहे.

श्रावण महिना असल्याने धार्मिक पर्यटनाला महत्त्व असते. त्याचा प्रत्यय जिल्ह्णााभर दिसत आहे. करवीर नगरीत महालक्ष्मी देवी, वाडी रत्नागिरी येथे जोतिबा, जैन तीर्थक्षेत्र बाहुबली,  कन्यागत महापर्व सुरू असलेले नृसिंहवाडी येथे भाविक पर्यटकांची लगबग वाढली आहे.

महालक्ष्मी देवीच्या दर्शनामध्ये महापालिका प्रशासनाचा गोंधळ अडसर ठरत आहे. महाद्वार रोडवरील धोकादायक इमारत अर्धवट पाडून खरमातीचा ढीग तसाच ठेवल्याने हा रस्ता जणू   बंदच  झाला आहे. त्यामुळे भाविकांची प्रचंड गरसोय होत आहे. महापालिकेने हे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

कोल्हापुरातील पूरस्थितीनंतर मागील आठवडय़ापासून महापालिकेच्यावतीने शहरातील धोकादायक इमारती पाडण्याचे काम सुरू आहे.  महालक्ष्मी देवीच्या मंदिराच्या महाद्वारसमोरील इमारतीचे मालक गोसावी यांना महापालिकेने ही इमारत पाडण्यासाठीची नोटीस वारंवार पाठविली होती. मात्र, मालकांनी त्यावर काहीच कार्यवाही केली नाही त्यामुळे महापालिकेने मागील आठवडय़ात या इमारतीचा वरचा मजला उतरवला.

मात्र, इमारतीचे मालक आणि कुळामध्ये न्यायालयीन वाद सुरू आहेत त्यामुळे पाडलेल्या इमारतीचे दगड, खर, माती, लाकडी फळ्या आदी साहित्य महाद्वारच्या मध्येच पडले आहे.

त्याभोवतीने बॅरिकेट्स लावण्यात आली आहे. त्यातच परिसरातील दुकानदार व फेरीवाल्यांनी रस्त्याची जागा अडवून ठेवली आहे. त्यामुळे येथे आता फक्त एक भाविक जाऊ शकेल इतकीच जागा शिल्लक राहिली आहे. ही अडचण त्वरित दूर करावी, अशी मागणी बजरंग दलाचे शहरप्रमुख महेश उरसाल यांनी केली आहे.