कोल्हापूर-मुंबई या मार्गाची विमानसेवा पुन्हा सुरू होण्याची आशा पल्लवित झाली आहे. येत्या जुलै महिन्यात कोल्हापूरची विमानसेवा मुंबईकडे झेप घेण्याची चिन्हे आहेत. याबाबत मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विमानतळ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पाटील यांनी महिनाभरात ही विमानसेवा सुरू करण्याची सूचना केली.

कोल्हापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचा नवनवा मुहूर्त नेहमी निघत असतो. गेल्या सात वर्षांपासून याबाबतचा प्रस्ताव रखडला होता. केंद्र सरकारच्या उडान योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर या हवाई मार्गाच्या प्रस्तावाला गती मिळाली होती. उडान योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर वाहतूक परवाना आणि मुंबईतील स्लॉट (वेळ) या कारणास्तव विमानसेवा सुरू होण्यास विलंब होत होता.

कोल्हापूर-मुंबई मार्गावर यापूर्वी ‘एअर डेक्कन’ कंपनीकडून आठवडय़ातून तीन दिवस या मार्गावर उड्डाण होत होते. नियमित सेवा मिळत नसल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. गतवर्षी या कंपनीची अखेरची फेरी झाली आणि विमानसेवा बंद झाली.

सध्या कोल्हापूर-तिरुपती, कोल्हापूर-हैद्राबाद विमानसेवा सुरू असून त्याला उदंड प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत आहे. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद झाल्यामुळे व्यापारी-उद्योजकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.

याबाबत पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन विमानसेवा आठवडय़ातून तीन दिवस सेवा (मंगळवार, बुधवार , रविवार) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जेट आणि स्टार एअर कंपनीची विमानसेवा महिनाभरात सुरू होणार आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी ६४ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार भूसंपादनाचा प्रस्ताव तातडीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सादर करण्याचे आदेश पाटील यांनी प्रशासनाला दिले.

नाईट लँडिंगचे काम अंतिम टप्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.