कोल्हापूर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष निवडीत बाजी मारलेल्या भाजप व मित्रपक्षांनी सोमवारी झालेल्या विषय समितीच्या सभापती निवडींमध्ये पुन्हा एकदा बाजी मारत विरोधी काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला धक्का दिला. सत्तारूढ भाजप, जनसुराज्य, शिवसेना, स्वाभिमानी आघाडीने अध्यक्ष – उपाध्यक्षपदाच्या निवडीमध्ये मिळवलेले ३७ सदस्यांचे संख्याबळ आजच्या निवडीमध्येही कायम राहिले. विरोधी काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला एक सदस्य उपस्थित ठेवता आला , यावरच समाधान मानावे लागले . त्यांचे संख्याबळ २९ राहिले.
बांधकाम सभापती जनसुराज्यचे सर्जेराव पाटील – पेरीडकर, महिला व बालकल्याण सभापतिपदी स्वाभिमानीच्या शुभांगी िशदे, समाजकल्याण सभापतिपदी निशांत महापुरे,तर शिक्षण व अर्थ सभापतिपदी शिवसेनेचे अमरीष घाटगे यांची निवड झाली. पीठासन अधिकारी म्हणून करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी काम पाहिले.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीमध्ये भाजप, ताराराणी आघाडीने बाजी मारल्यानंतर जिल्ह्याचे लक्ष जिल्हापरिषदेतील विषय समित्यांच्या निवडीकडे लागले होते. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने केलेली चमत्काराची भाषा, तसेच विषय समित्यांच्या निवडीवरुन भाजप, शिवसेना जनसुराज्य आघाडीमधील धुसफूस यामुळे या निवडींकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. निवडीमध्ये सदस्यांच्या फोडाफोडीचे राजकारणास उधाण आले होते, मात्र भाजपने आपले संख्याबळ कायम राखले. या निवडीच्या पाश्र्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तप्त उष्म्याहून अधिकच चांगलेच तापले होते.
विरोधकांचे नेते अनुपस्थित
विषय समिती निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सकाळी ११ ते १ या वेळेत होती. सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास भाजप आघाडीचे सदस्य उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. आमदार डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, सावकर मादनाईक,भगवान काटे यांच्यासह उमेदवार जिल्हापरिषदेमध्ये दाखल झाले. या वेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले. या वेळी आघाडीचा एकही प्रमुख नेता उपस्थित नव्हता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 2:11 am