02 March 2021

News Flash

हजारो भाविकांच्या साक्षीने ललितापंचमीचा सोहळा

‘टेंबलाईच्या नावानं चांगभलं..’च्या गजरात आज हजारो भाविकांच्या साक्षीने ललितीपंचमीचा सोहळा पारंपरिक उत्साहात पार पडला.

नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीची ‘गजारूढ अंबाबाई’ रूपातील पूजा बांधण्यात आली. (छाया- राज मकानदार)

शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीची ‘गजारूढ अंबाबाई’ रूपातील पूजा बांधण्यात आली. करवीरनिवासिनी महालक्ष्मी-त्र्यंबोली भेट आणि ललितापंचमीचा कोहळा फोडण्याचा विधी त्र्यंबोली टेकडीवर दुपारी पारंपरिक पद्धतीने झाला.

युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत महालक्ष्मी भेटीनंतर त्र्यंबोलीची आरती झाली व कोहळा फोडण्याचा विधी झाला. आर्या  गुरव हिला यंदा कुमारिकेचा मान होता. या विधीनंतर काही तरुणांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

‘टेंबलाईच्या नावानं चांगभलं..’च्या गजरात आज हजारो भाविकांच्या साक्षीने ललितीपंचमीचा सोहळा पारंपरिक उत्साहात पार पडला. भाविकांच्या प्रचंड गर्दीत कुमारिका आर्या गुरव हिने तलवारीने कोहळय़ावर वार करताच कोहळय़ाचा तुकडा मिळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. या वेळी हुल्लडबाजी आणि धक्काबुक्की करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून गर्दी पांगवली.

दरम्यान, महालक्ष्मी मंदिरातून निघालेल्या पालखीतील महालक्ष्मीची उत्सवमूर्ती आणि त्र्यंबोली यांची भेट झाल्यानंतर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. पालखीच्या स्वागतासाठी त्र्यंबोली मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर रांगोळय़ा व फुलांच्या पायघडय़ा घालण्यात आल्या होत्या.

ललितापंचमी म्हणजे श्री महालक्ष्मीच्या नित्यक्रमातला वेगळा दिवस. आज देवीचा शृंगार दुपारी बाराच्या आधीच होतो. या दिवशी देवी तिची प्रिय सखी त्र्यंबोली हिच्या भेटीसाठी निघते. कामाक्ष दैत्याचा वध करून करवीराच्या पूर्वेला रुसून बसलेल्या त्र्यंबोलीचा रुसवा काढण्यासाठी महालक्ष्मी लवाजम्यासह निघते. कोल्हासुर वधाचे प्रतीक म्हणून तिच्या दारात कोहळय़ाचा भेद केला जातो. प्रत्यक्ष देवी महालक्ष्मीच्या वचनानुसार महालक्ष्मी समस्त देव, ऋषी, त्यांचे परिवार, श्री त्र्यंबोलीच्या दर्शनाकरिता निघालेल्या स्वरूपात आजची पूजा गजारूढ रूपातील बांधण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 1:46 am

Web Title: laalitapanchami festival with thousands of devotees
Next Stories
1 सांगलीतील दुष्काळी तालुक्यांची सुभाष देशमुख यांच्याकडून पाहणी
2 शासनाच्या मदतीनंतरही सूतगिरण्यांचा धागा उसविलेलाच
3 बनावट सोने तारण ठेवून ४० लाखांची फसवणूक
Just Now!
X