कृती दलाचे ताशेरे; बेजबाबदारपणा चव्हाटय़ावर

कोल्हापूर : करोना रुग्णांवरील उपचाराबाबत सुयोग्य उपचार प्रणालीचा अभाव जाणवला आहे. प्रशिक्षित मनुष्यबळाची उणीव आहे. योग्यरीत्या मृत्यू लेखापरीक्षण होत नाही, असे ताशेरे कृती दलाने मारले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यतील करोना उपचार प्रणालीतील बेजबाबदारपणा चव्हाटय़ावर आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यतील करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शासनाला कृती दल पाठवण्याची सूचना केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी डॉ. सुभाष साळुंखे, डॉक्टर डी. बी. कदम व डॉ. आरती किणीकर यांचे पथक कोल्हापूर साठी नियुक्त केले होते.

कृती दलाचे सदस्यांनी छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार पद्धतीची माहिती दिली. त्यावर त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. करोना उपचाराच्या सुयोग्य प्रणालीचे पालन केले जात नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील त्रुटी त्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या निदर्शनाला आणून देऊन त्या तातडीने कमी करण्याच्या सूचना दिल्या.

करोना मृत्यू इतक्या मोठय़ा प्रमाणात कसे होतात, अशी विचारणा त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. उपचाराबाबत कृती रेषा निश्चित केल्याने पंधरवडय़ात यात बदल दिसेल असे मत साळुंखेयांनी व्यक्त केले. करोना लक्षणे दिसू लागल्यानंतरही घरी वा प्राथमिक उपचार केले जातात. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्याने उपचारात अडथळे येऊन मृत्यू वाढतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.