सासूवर मातृवत प्रेम करणाऱ्या सुनेने सासूच्या निधनाचा धक्का सहन न होऊन राहत्या घरावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी कोल्हापुरात घडली. येथील आपटेनगर परिसरात लोखंडे कटुंबियाला या दुहेरी घटनेने जबर धक्का बसला आहे. पहाटे सासू मालती यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर ४० वर्षीय सुनेने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन जीवनयात्रा संपवली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यात अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे देखील प्रथम दर्शनी दिसत आहे. मात्र, शुभांगी यांचा पाय घसरुन त्या पडल्या असाव्यात असे त्यांच्या पतीचे म्हणणे आहे.

मधुकर लोखंडे हे मुळचे सांगली जिल्ह्यातील बागणीचे. ते आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही शिक्षक होते. ते सेवानिवृत्त आहेत. त्यांचे कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून कोल्हापुरात आपटेनगरात राहतात. आज पहाटे त्यांच्या पत्नी मालती ( वय ७०) यांचा मृत्यू झाला घरामध्ये शोकाकुल वातावरण झाले. मालती यांच्या पार्थिवाजवळ पती मधूकर आणि त्यांचा मुलगा संदीप बसून होते. सासूबाईंचा मृत्यू झाल्याचे सून शुभांगी यांना समजले. सासूला त्या आईसमान मानत होत्या. त्या घाईघाईने घऱाच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या उपासना खोलीत गेल्या. त्यांनी अंगारा, धुपारा घरामध्ये टाकायला सुरुवात केली. कुठल्यातरी प्रयत्नाने सासूबाई बऱ्या होतील, अशी त्यांची श्रद्धा होती. याच भावनेतून त्यांनी सासूबाईंना देखील अंगारा लावला असल्याची माहिती मृत मालती यांच्या पतीने दिली.

त्यामुळे या घटनेला कुठेतरी अंधश्रद्धेची किनार लागल्याची चर्चा आहे. शुभांगी या जेथून खाली कोसळल्या त्या टेरेसच्या कट्ट्यावर देखील अंगारा पसरला असल्याचे पाहायला मिळाले. उपासना कक्षातही अनेक देवदेवतांचे तसबिरी आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरु केला. शुभांगी यांचा पाय घसरुन त्या पडल्या असाव्यात असे त्यांच्या पतीचे म्हणणे आहे. शुभांगी या अंगारा टाकत होत्या अशी माहिती मिळाली आहे . याचवेळी त्या टेरेसवरून कोसळून पडल्या असाव्यात, अशी प्राथमिक माहिती आहे . घटनेचा सविस्तर तपास झाल्यावर वस्तुस्थितीचा उलगडा होईल, असे पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी सांगितले.