News Flash

मुखपट्टय़ा निर्मितीत नामांकित कंपन्या, मरगळलेल्या वस्त्रोद्योगाला दिलासा

पेहरावाच्या कपडय़ाप्रमाणे मुखपट्टीसुद्धा बाजारात येत असल्याने रंगसंगतीची जोड मिळणार आहे.

संग्रहित छायाचित्र

दयानंद लिपारे

करोना संसर्ग टाळण्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेतील पहिले नाव म्हणजे मुखपट्टी. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मुखपट्टी नसेल तर आता दंडात्मक कारवाईसुद्धा सुरू झाली आहे. यातून मुखपट्टीचे महत्त्व अधोरेखित होत असताना नामांकित कंपन्यांनी मुखपट्टीच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. अनेक कंपन्यांनी आपली मुखपट्टीची उत्पादने बाजारात आणली असून ‘ब्रँड’वर (व्यापारी मुद्रा) प्रेम करणाऱ्या ग्राहकांच्या त्यावर उडय़ा पडत आहेत. इतकेच नव्हे तर पुढील टप्प्यांमध्ये पेहरावाच्या कपडय़ाप्रमाणे मुखपट्टीसुद्धा बाजारात येत असल्याने रंगसंगतीची जोड मिळणार आहे.

करोनाचा संसर्ग  वाढल्याने त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय शासनाने लागू केले आहेत. निर्जंतुकीकरणाचा वापर, सामाजिक अंतर याच्या बरोबरीने सर्वात आधी नाव घेतले जाते ते मुखपट्टीचे. फेब्रुवारीपासून मुखपट्टी वापराचे प्रमाण वाढू लागले. मार्च महिन्यापासून तर मुखपट्टी ही जीवनशैलीचा भाग बनली. हल्ली तर तिचीच एक नवी बाजारपेठच जन्माला आली.

वस्त्रोद्योगाला मंदी आणि संधी

ग्राहकांची ही मानसिकता लक्षात घेऊन मुखपट्टी बनवण्यामध्ये अनेक नामांकित कंपन्या उतरलेल्या आहेत. करोनामुळे नवीन कपडय़ांची खरेदी कमालीची मंदावली असताना बडय़ा कंपन्या चिंतेत आहेत. त्याची चिंता ब्रँडेड मुखपट्टीने काही प्रमाणात सोडवली आहे. ब्रँडेड मुखपट्टीला लक्षणीय मागणी आहे. ‘वाइल्डक्राफ्ट’ कंपनीच्या मुखपट्टीला मोठी मागणी आहे. कापड व्यवसायात फारसे नाव नसलेली गोदरेजसारखी कंपनीही यामध्ये उतरलेली आहे. याचबरोबर प्युमा, पीटर इंग्लंड, अलेन सोली, व्हान हुसेन यांसारख्या डझनावारी ब्रँडेड कंपन्यांनी मुखपट्टीचे उत्पादन बाजारात आणले आहे. एक, तीन व पाच संच अशा पद्धतीने विक्री सुरू आहे. बालक व महिला यांच्यासाठी वेगळ्या धाटणीच्या मुखपट्टी बनवल्या आहेत. सामान्य मुखपट्टीच्या तुलनेत याच्या किमती तिप्पट-चौपट आहेत. काहीशे रुपयांना त्या विकल्या जात असल्या तरी विशिष्ट ग्राहक वर्ग त्याची आवर्जून खरेदी करताना दिसत आहे. या मुखपट्टीवर कंपनीचा विशिष्ट कंपनीचा नक्षी/आकृती (लोगो) असल्याने आपण इतरांपेक्षा वेगळी मुखपट्टी वापरली आहे हे ठसवण्यास मदत होते. शिवाय, मुखपट्टी चेहऱ्याच्या मधोमध असल्याने लोगो चटकन पाहणाऱ्यांच्या नजरेत भरतो. ‘कोल्हापूरसारख्या शहरातही अनेक कंपन्यांची ब्रँडेड मुखापट्टी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्युमा मुखपट्टी ४९९ रुपयांना दोन, सातशे रुपयांना तीन, जॅक अंड जोन्सची मुखपट्टी तीनशे रुपयाला, तर पीटर इंग्लंडच्या मुखपट्टी पाचशे रुपयाला तीन याप्रमाणे उपलब्ध आहेत. या मुखपट्टी खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे,’ असे ब्रँडेड वस्तूंचे व्यवस्थापक साबीर हुसेन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

सुधारणांचे पुढचे पाऊल

पुढील काळामध्ये मुखपट्टीमध्ये आणखी सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत त्याच रंगसंगती, डिझाईनची मुखपट्टी बनवली जाणार आहे. लग्नकार्यासाठी वेगळ्या, पण महागडय़ा मुखपट्टी बनवल्या जात आहे. वराचा सूट-शेरवानी वा वधूची पैठणी, विशिष्ट पद्धतीचा ड्रेस याला साधर्म्य असणारी मुखपट्टी विशेष मेहनत घेऊन बनवली जात असून यासाठी खिसा हलका करावा लागत आहे.

साधे ते ब्रँडेड

सुरुवातीच्या काळामध्ये स्थानिक पातळीवरील कपडे बनवणाऱ्या (गारमेंट) उद्योगातून मुखपट्टी बनवली जात होती. त्याच्या किमतीही पंधरा-वीस रुपयांपासून ते पन्नास रुपये अशा सीमित होत्या. सुरुवातीला अन्य काही पर्याय नसल्याने लोकसुद्धा याच मुखपट्टीचा वापर करत होते. केवळ वैद्यकीय क्षेत्रातील आणि रुग्णालयातील कर्मचारी यांच्याकडून ‘एन ९५’ ही प्रमाणित मुखपट्टी वापरली जात होती. करोनाचा संसर्ग वाढू लागल्यावर लागू करण्यात आलेली टाळेबंदी दोन महिन्यांनंतर आता टप्प्याटप्प्याने शिथिल होत असल्याने लोकांचा वावरही वाढला आहे. अर्थात सार्वजनिक ठिकाणी वावरताना लोक मुखपट्टी आवर्जून वापरत असल्याचे सर्वत्र दिसत आहे किंवा ती न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मुखपट्टी वापरातील एक ठळक बदल एव्हाना जाणवत आहे. साधी मुखपट्टी वापरण्याऐवजी ‘ब्रँडेड’ मुखपट्टी वापरण्याकडे तरुण पिढीचा कल वाढला आहे. मुळातच अलीकडे एका वर्गाला ब्रँडेड वस्तू वापरण्याचे भलते आकर्षण आहे. कपडे, पेन, गॉगल, शूज, टोपी, चप्पल अशा दैनंदिन वापरातील वस्तू या ब्रँडेड असाव्यात असा त्यांचा आग्रह असतो. त्याच्या वापरामुळे समाजात आपला स्तरही उंचावतो, असा त्यांचा समज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 12:17 am

Web Title: leading companies in the manufacture of masks relief to the struggling textile industry abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कोल्हापुरकरांची खबरदारी; रक्तदाब, मधुमेह, ह्रदयरोगाचे सर्वाधिक रुग्ण, पण करोनाचा संसर्ग कमी
2 कोल्हापूर : जमीन खरेदीत फसवणूकप्रकरणी उप अधीक्षकासह चार जणांवर गुन्हे दाखल
3 “राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राजू शेट्टींनी सोडलं ताळतंत्र”; भाजपाचा पलटवार
Just Now!
X