01 March 2021

News Flash

पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी

भाजपला यशाची अपेक्षित झेप घेता आली नाही.

निकाल जाहीर होताच विजयी उमेदवाराला उचलून घेत जल्लोष केला जात होता. (छाया - राज मकानदार)

दयानंद लिपारे

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील विजयाची पुनरावृत्ती ग्रामपंचायत निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात बघायला मिळाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्य़ांमध्ये महाविकास आघाडीचा करिष्मा पुन्हा एकदा दिसला. भाजपला यशाची अपेक्षित झेप घेता आली नाही.

पश्चिम महाराष्ट्र हा तसा काँग्रेस- राष्ट्रवादी या उभय काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पाच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावर पश्चिम महाराष्ट्रातील दोन्ही काँग्रेसमधील अनेक प्रमुखांनी हाती कमळ धरले होते. यामुळे शहरी भागातील महापालिका असो की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद निवडणुका येथे भाजपचा प्रभाव काँग्रेसजनांना धडकी भरवणारा होता. अर्थात त्याला शिवसेनेचीही साथ तितकीच कारणीभूत होती. हे चित्र पुन्हा बदलत असून पश्चिम महाराष्ट्रातील उभय काँग्रेसचा प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. पाठोपाठ शिवसेना व काँग्रेसने यश मिळाले. कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्य़ात राष्ट्रवादीच्या घडय़ाळाची टिकटिक प्रभावी ठरली. जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील यांच्या रणनीतीला यश लाभले आहे. सातारा जिल्ह्य़ात राष्ट्रवादीने अजिंक्य असल्याचे भरघोस यशाद्वारे दाखवून दिले. त्यांच्या बरोबरीने शिवसेनेलाही ग्रामीण भागात पुन्हा पाय रोवण्याची संधी मिळालेली आहे. स्थानिक आघाडय़ा प्रभावी ठरल्या असल्या तरी निवडून आलेल्या उमेदवारांची पक्षनिहाय वर्गवारी केली असता या तिन्ही पक्षांनी मिळून बहुतांशी ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे.

अतुल भोसले यांची प्रभावी कामगिरी

कोल्हापुरात सतेज पाटील यांनी विधानसभा, शिक्षक पदवीधर पाठोपाठ ग्रामपंचायतीत यशाची पुनरावृत्ती केली आहे. कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व दिवंगत नेते विलासकाका उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांचे मनोमीलन ग्रामीण भागाच्या निवडणुकीत प्रभावी ठरणार अशी अटकळ होती, पण त्यांना अपेक्षित परिणाम साधता आला नाही. येथे भाजपच्या अतुल भोसले यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कराड तालुक्यातील १०४ पैकी १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. बहुतांश ठिकाणी बाळासाहेब पाटील यांचा करिष्मा दिसून आला. पृथ्वीराज चव्हाण यांना अपेक्षित यश मिळाले नाही. असेच चित्र सोलापूर जिल्ह्य़ात दिसून आले आहे. शहरी सोलापूर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याने ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी ग्रामीण भागात फारसे लक्ष घातले नाही. त्यामुळे काँग्रेसला सोलापूर जिल्ह्य़ात भरीव यशापासून दूर राहावे लागले. अक्कलकोटमध्ये सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसचा झेंडा रोवून पक्षाची ताकद दाखवून दिली.

चंद्रकांत पाटील यांना धक्का

कोल्हापूर जिल्ह्य़ातील खानापूर हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव. त्यांनी काँग्रेसची आघाडी करूनही शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी त्यांना शह दिला. राधानगरी- भुदरगड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सूतोवाच चंद्रकांत पाटील यांनी केले होते तेव्हा प्रकाश आबिटकर यांनी ‘येथे येऊन लढून तरी दाखवा’ असे आव्हान दिले होते. तेव्हा हुकलेला सामना आता ग्रामपंचायतीच्या निमित्ताने होऊन त्यात सेनेचा भगवा सरस ठरला. सोलापुरातील विजयसिंह मोहिते-पाटील हे प्रभावी नेते. प्रतापसिंह मोहिते-पाटील परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून धवलसिंह मोहिते-पाटील यांनी निवडणूक लढवली. येथे विजयसिंह मोहिते-पाटील यांना सत्ता स्थापन करता आली असली तरी ‘गड आला पण सिंह गेला’ अशी अवस्था पुतण्याच्या पराभवामुळे झाली आहे. भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे ग्रामीण आपला सोलापूर जिल्ह्य़ात अपेक्षित यश मिळाले नाही. असेच चित्र सातारा व कोल्हापूर या जिल्ह्य़ातही राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 12:18 am

Web Title: leading mahavikas aghadi in western maharashtra abn 97
Next Stories
1 कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ प्रस्तावावरून वाद
2 हुतात्मा दिन कार्यक्रमाला निघालेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पोलिसांनी रोखले 
3 पंचगंगेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या उद्योगांना टाळे लावा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Just Now!
X