सरत्या वर्षाला निरोप देताना मद्याचे पेले रिचवून व्यसनाला निमंत्रण देण्याऐवजी दुग्धपान करून शरीर संपदा कमावण्याचा अभिनव उपक्रम गुरुवारी करवीरनगरीत राबविण्यात आला. याअंतर्गत अक्षर-दालन आणि निर्धार या संस्थांच्या वतीने सायंकाळी काव्य वाचनासवे दुग्धपान करण्यात आले. तसेच, विविध महाविद्यालयात ‘द’ दारूचा नाही, ‘द’ दुधाचा, चला व्यसनांना बदनाम करूया, या उपक्रमाला तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गेल्या तीन वर्षांपासून अक्षर-दालन संस्थेचे रिवद्र जोशी आणि निर्धारचे समीर देशपांडे यांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काव्यवाचन, दुग्धपान हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सायंकाळी कोळेकर टिकटी येथील अक्षर दालनमध्ये आयोजित केलेल्या काव्य संमेलनास जिल्ह्यातील मान्यवर, ज्येष्ठ युवा कवी, कवयित्रींनी हजेरी लावली. शासकीय अधिकाऱ्यांचाही उपक्रमामध्ये सहभाग राहिला. अक्षर गप्पांच्या वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये कवींना कविता सादर करण्याची संधी मिळत नसते. ती आज मिळाल्याने कवीही खुलले होते.
नवीन वर्षाचं स्वागत दूध पिऊन करावे. जीवनातून व्यसनांना हद्दपार करा, हा संदेश देत आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने दुग्धपानाचे आयोजन केले होते. महापौर अश्विनी रामाणे यांनी दारुच्या प्रतीकात्मक बाटलीला चप्पल मारून या उपक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीदेखील या बाटलीला चप्पल मारत या उपक्रमात सहभाग नोंदवला. अनेक विद्यार्थानी नवीन वर्षाची सुरुवात एका नवीन विचाराने आणि व्यसनांना हद्दपार करण्याच्या निर्धाराने केल्याचे या वेळी दिसून आले.
जल्लोष नववर्षाचा
सरत्या वर्षाचा अखेरचा दिवस म्हणजे थर्टी फर्स्टच्या जल्लोषाला प्रारंभ झाला. हॉटेल, रिसॉर्ट येथे नववर्षाच्या स्वागताला उधाण आले होते. दिवसभर मटण मार्केट आणि चिकन विक्री दुकानांत गर्दी राहिली. रस्सामंडळांचेही बेत आयोजित केले होते. यंदाही ‘एक गल्ली – एक पार्टी‘, ‘एक अपार्टमेंट – एक पार्टी‘ ही संकल्पना बऱ्याच ठिकाणी राबवण्यात आली. एकीकडे तरुणाईचा जल्लोषी माहौल असला तरी त्याच वेळी मटणाच्या तांबडय़ा पांढऱ्या रश्श्यावर ताव मारला गेला. मात्र, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने अनेकांनी लक्ष्मीचे दर्शन घेत मिष्टान्नाला पसंती दिली. बारा वाजण्याच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद साजरा करताना आलिंगन देऊन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तर बेभान झालेल्या तरुणाईला आवर घालण्यासाठी शहरात जागोजागी कडेकोट पोलिस बंदोबस्त तनात करण्यात आला होता.