विधानपरिषदेसाठी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर होणार या अपेक्षेने मंगळवारी जिल्ह्याचे लक्ष नागपूरकडे लागले तरी निर्णय न झाल्याने उमेदवारीची संभ्रमावस्था कायम राहिली. बुधवारी उमेदवारी जाहीर होण्याचे संकेत असून अखेरच्या दिवशी उमेदवारीच्या स्पध्रेत कोण बाजी मारणार, याचे कुतूहल निर्माण झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोल्हापूर स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्विवार्षकि निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या सातव्या दिवशी दोन उमेदवारांनी चार नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
आज दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रात अशोक रामचंद्र जांभळे यांनी अपक्ष म्हणून दोन व प्रकाश मारुती मोरबाळे यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांच्याकडे दाखल केली. जांभळे हे यापूर्वी विधानपरिषद मतदार संघातून एकदा निवडून आले होते. तर एकदा त्यांनी अर्ज मागे घेतला होता. इचलकरंजी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते नगरसेवक आहेत. तर मोरबाळे हे काँग्रेस नगरसेवक असून काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी सूचक म्हणून सही केली आहे. इचलकरंजीतील काँग्रेसचे नेते प्रकाश आवाडे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना मोरबाळे यांनी अर्ज दाखल केल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, मंगळवारी नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले सतेज पाटील व प्रकाश आवाडे या दोन्ही माजी मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी उमेदवारीबाबत आणखी एकदा चर्चा केली. या दोघांनी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे यांची भेट घेऊन उमेदवारीचा आग्रह धरला. मंगळवारी दिवसभर उमेदवारीची प्रतीक्षा असल्याने माध्यमांकडे सातत्याने चौकशी होत होती. तथापि, बुधवारी उमेदवारी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येते. आपल्याला उमेदवारी मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त करणाऱ्या इच्छुकांमध्ये आता चलबिचलता निर्माण झाली असून कोणालाही उमेदवारी मिळू शकते असा सूर निघत आहे.