शाहूवाडी तालुक्यातील खूनप्रकरणी कोल्हापूर जिल्हा दलित महासंघाचा अध्यक्ष लालासाहेब ऊर्फ रघुनाथ शंकर नाईक यास गुरुवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर अन्य चार आरोपींना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरुड (ता. शाहूवाडी) येथील परशुराम ज्ञानदेव नाईक याच्या खूनप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
परशुराम नाईक व आरोपी लालासाहेब नाईक यांच्यात ग्रामपंचायतीच्या गावठाणातील मोकळय़ा जागेच्या वापरावरून वाद झाला होता. १ फेब्रुवारी २०११ रोजी जनावरांसाठी गोठा बांधण्यावरून पुन्हा वाद झाला. तेव्हा नाईक याने हातातील लोखंडी गजाने तर इतर आरोपींनी काठय़ा व लाकडी फाळय़ाने परशुराम नाईक याच्यावर हल्ला चढवला. त्याच्या डोक्यास जबर मार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. फिर्यादीने शाहूपुरी पोलिसात हल्लेखोरांची माहिती दिली होती. मारहाणीमध्ये फिर्यादी नाईक हा मृत्यू पावला. या घटनेबाबत शाहूवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. एस. घोगरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यावर सुनावणी होऊन गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एम. खंबायते यांनी वरीलप्रमाणे निर्णय दिला. लाला नाईक यास जन्मठेप, दहा हजार रुपये दंड तसेच आणखी एक कलमान्वये १ वष्रे सक्तमजुरी व दंड अशी शिक्षा दिली असून या दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. तर बाजीराव सदाशिव नाईक, रंगराव सदाशिव नाईक, संभाजी सर्जेराव नाईक व विष्णू बापू नाईक या चौघांना सहा महिने सक्तमजुरी व दोनशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.