कोल्हापूर : मराठा , धनगर समाजानंतर आता लिंगायत समाजाचे आंदोलन सुरु होत आहे. लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र व कोल्हापूर लिंगायत समाज संस्था कोल्हापूर यांच्यावतीने विविध  मागण्यांसाठी गुरूपासून (१६ ऑगस्ट)येथील  दसरा चौकात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर  धरणे आंदोलन करण्याचे जाहीर झाले होते पण प्रशासनाने परवानगी नाकारल्याने हे धरणे आंदोलन आता ऐतिहासिक दसरा चौकामध्ये होणार आहे. या आंदोलनासाठी जिल्ह्यत व  गावोगावी बैठका सुरु झाल्या असून त्यामध्ये आर या पार च्या लढाईसाठी नियोजन केले जात आहे.

लिंगायत धर्मियांसाठी स्वतंत्र धर्माचा दर्जा, अल्पसंख्याक दर्जा, धर्मातील उर्वरित पोटजातींना आरक्षण, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, गाव तिथे रुद्रभूमी, जनगणना फॉर्ममध्ये लिंगायत नोंदीसाठी स्वतंत्र कॉलम या प्रमुख मागण्यांसाठी  आंदोलन केले जाणार आहे.  या धरणे आंदोलनात दररोज कोल्हापूर जिल्ह्यतील विविध गावांतून तसेच संपूर्ण राज्यातून समाजबांधव सहभागी होणार आहेत.

भाजप नेत्यांनी लिंगायत धर्मियांना सत्तेत आल्यानंतर १५ दिवसात मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले होते पण गेली ४ वर्षे कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे सरकारने लिंगायत धर्मियांचा अंत पाहू नये, अशी भावना लिंगायत समाजबांधवांकडून व्यक्त होत असल्याचे सरलाताई पाटील, राजशेखर तंबाखे, बाबुराव तारळी, काकासाहेब कोयटे, मिलिंद साखरपे, नीलकंठ मुगुळखोड, विलास आंबोळे यांनी सांगितले.