दयानंद लिपारे

दूध दराच्या प्रश्नावरून राज्यातील शेतकऱ्यांची विवंचना वाढली असून राज्य सरकारसमोर तो सोडवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. हा प्रश्न राज्य व केंद्र पातळीवरील असताना त्यावरून जुन्या मुद्दय़ावरून कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ातील आजी-माजी मंत्री व आजी-माजी खासदार यांच्यातील शाब्दिक वाद टोकाला गेला आहे. कोल्हापूर- सांगली जिल्ह्य़ात यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या दूध प्रश्नाला उकळी आली असून राजकारण तापले आहे.

करोना संसर्गामुळे राज्यातील दुधाच्या विक्रीमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. हॉटेल, मिठाई, आइसक्रीम आदींच्या वापरासाठी दुधाचा मोठय़ा प्रमाणात वापर होत होता. मात्र आता हे व्यवहार बऱ्याच प्रमाणात बंद असल्याने दूध विक्रीवर परिणाम झाला आहे. परिणामी दुधाचे दरही प्रचंड प्रमाणात घटले आहेत. प्रतिलिटर पंचवीस ते तीस रुपये असणारे गाईचे दूध आता १५ ते २० रुपये लिटर तर म्हशीचे दूध ३५ ते ४० वरून ३० रुपये लिटपर्यंत घसरले आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १० लाख लिटर दूध खरेदी करण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. मात्र त्याचा एकूण दूध विक्रीवर मर्यादित परिणाम होत आहे. यानंतरही दुधाचे दर घसरणीला लागले आहेत. त्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले असताना स्थानिक पातळीवरून या मुद्दय़ावरून कुरघोडीचे राजकारण रंगले आहे.

शेट्टी-खोत यांच्यात संघर्घ

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील जिवलग मित्र असणारे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. नंतर त्यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. राज्यातील दूध घराच्या प्रश्नावरून दोघांतील वाद शिगेला पोहोचला आहे. ‘दुधाचा प्रश्न हा केंद्र सरकारकडे नसून तो राज्य सरकारकडे आहे. पण आमदारकीसाठी लाचार झालेले शेट्टी आता राज्य सरकारविरोधात आंदोलन करीत नाहीत अशी टीका खोत यांनी केली. त्याला शेट्टी समर्थकांनी उत्तर दिले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर खोत यांनी साक्री (धुळे) येथील देवकीनंदन दूध संस्थेतील शेतकऱ्यांचे पैसे परत करावेत, अशी मागणी स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली आहे. शेट्टी यांच्या इशाऱ्याने खोत यांना यानिमित्ताने पेचात पकडले आहे.  राज्यातील दूध प्रश्न भर पावसात तापत चालला असताना कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ातील बडे नेते मात्र जुन्या मुद्दय़ावरून एकमेकावर शरसंधान करत आहेत.

पाटील-महाडिक वादाने उचल

राज्य शासनाने दूध दरवाढ द्यावी या मागणीसाठी भाजपने शनिवारी राज्यव्यापी आंदोलन केले. कोल्हापुरात राष्ट्रीय महामार्गावर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी रास्ता रोको आंदोलन केले. राज्य सरकारने दूध दरामध्ये पाच रुपये दरवाढ केली पाहिजे या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केले. त्यावरून त्यांचे राजकीय स्पर्धक गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक यांच्यावर टीका केली. ‘महाडिक नेतृत्व करत असलेल्या राज्यातील सर्वात मोठय़ा गोकुळ दूध संघाने आधी प्रति लिटर ५ रुपये दरवाढ देऊन दाखवावी’, असे आव्हान पाटील यांनी दिले. त्याला प्रत्युत्तर देत महाडिक यांनी ‘आजही गोकुळ दर २५ रुपये प्रति लिटर दर देत असून राज्यातील अन्य सहकारी व खाजगी संघाहून तो अधिक असल्याने सतेज पाटील यांनी औदार्य दाखवून गोकुळच्या संचालकांचा सत्कार करावा’, असे उत्तर दिले.