दयानंद लिपारे

कोल्हापूर जिल्ह्य़ात करोनाचा संसर्ग वाढतच असल्याने आता स्थानिक पातळीवर टाळेबंदीचा निर्णय घेतला जात आहे. ‘जनता संचारबंदी’ नावाने जिल्ह्य़ाच्या निम्म्याहून अधिक भागांत ही टाळेबंदी लागू झाली आहे. संचारबंदी लागू करण्यावरून आता व्यापारी, नागरिकांमध्ये वाद होऊ लागले आहेत. कोल्हापूर शहरात शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या संचारबंदी वरून व्यापारी वर्गामध्ये मतभेद होऊन  एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले आहेत. शिरोळ तालुक्यांमध्येही असाच प्रकार घडला आहे. यामुळे स्थानिक संचारबंदीच्या या प्रकरणाला संघर्षांची किनार लाभली आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ात गेल्या दोन महिन्यांमध्ये करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जिल्ह्य़ामध्ये रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याला आवर घालण्यासाठी प्रयत्न होत असले तरी शहर आणि तालुक्यांमध्ये सर्वत्र करोनाबाधित वाढत आहे. करोनाबाधितांची संख्या ३२ हजारांहून अधिक झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून दररोज पाचशे ते हजार रुग्ण आढळत आहेत. ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्य़ात स्थानिक पातळीवर संचारबंदी लागू करण्याच्या निर्णय घेतला जात आहे. कागल, राधानगरी, पन्हाळा, करवीर, शिरोळ आदी तालुक्यांमध्ये हा निर्णय घेतला गेला आहे.

कोल्हापूर शहरातही रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत चालल्याने शहरात संचारबंदी लागू करण्यासंदर्भात एकाच दिवशी दोन बैठका झाल्या. चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीमध्ये तर व्यापाऱ्यांची दोन गट समोरासमोर उभे ठाकले. तयार कपडे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी बंदला स्पष्टपणे विरोध दर्शवला गेला. ८० दिवस दुकाने बंद ठेवली. त्यामुळे आर्थिक कुचंबणा झाली आहे. घरखर्च चालवणे कठीण बनले आहे. असे असताना पुन्हा टाळेबंदी लागू केल्यास त्यामध्ये व्यापारीवर्ग आयुष्यातून उठेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तर शहरातील परिस्थिती पाहता व्यापाऱ्यांनी संचारबंदीसाठी सहकार्य करण्याची गरज चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावरून कापड व्यापारी आणि चेंबरचे पदाधिकारी यांच्यामध्ये जुंपली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. या वादानंतर ११ तारखेपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. असाच निर्णय सायंकाळी महापालिकेत महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कोल्हापूर शहरात पुढील आठवडाभर स्थानिक ऐच्छिक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन गट आमने-सामने

मोठी बाजारपेठ असलेल्या राजारामपुरी तसेच करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिराचे स्थान असलेल्या महाद्वार रस्त्यावरील व्यापाऱ्यांनीही बंदला विरोध करणार असल्याचे सांगत दुकाने उघडण्याचा निर्णय आज जाहीर केला. तर हिंदुत्ववादी संघटनांनी जनतेचे मत विचारात न घेता जबरदस्तीने जनता संचारबंदी लावण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. मुखपट्टी न वापरल्यास महापालिका ५ हजार रुपये दंड वसूल करीत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जनतेला विचारात न घेता मनमानी पद्धतीने बंद केल्यास जन आंदोलन उभे करण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. भाजपचाही असाच सूर दिसत आहे. त्यामुळे कोल्हापूर शहर बंद करण्याच्या निर्णयावरून दोन गट थेट आमने-सामने आले आहेत. बंद समर्थक आणि बंद विरोधक यांच्यात संघर्ष उभा राहिला आहे. अशा स्थितीत आता स्थानिक संचारबंदीला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वाचे लक्ष आहे.