राष्ट्रवादीला मत देणार असाल तर अजित पवार धरणं कशी भरणार होते ते आठवा, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर येथे केला. यावेळी त्यांनी शरद पवारांवरही टीका केली. समोर शिल्लक कोण राहलयं हेच आता कळत नाही. म्हणून देवेंद्रजी कृपा करुन शरद पवारांना भाजपामध्ये घेऊ नका, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूर येथे आज (रविवार) फोडण्यात आला. त्यावेळी जाहीर सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला आणि सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीही त्यांनी यावेळी जाहीर केली. माथाडी कामगारांचा नेता मला खासदार बनवून दिल्ली मध्ये पाठवायचा आहे, असे ते म्हणाले.

आपल्या हॄदयातला भगवा विधानसभा आणि लोकसभेवर सुद्धा फडकला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये शिवप्रेम रक्तामध्ये घेऊनच नवजात बालकं जन्माला येतात असं जर म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. मला खात्री आहे आपलं सरकार पुन्हा आल्यानंतर लवकरात लवकर राम मंदिर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.

शरद पवारांवर टीका करताना ते म्हणाले की, एक खेळाडू (इम्रान खान) देशाचा पंतप्रधान झाला आणि आमच्याकडे पवारसाहेब देशाचे पंतप्रधान पदाचं स्वप्न बघणारे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले. महाराष्ट्र खड्ड्यात घालण्यात ज्यांनी आयुष्य घातलं, अशी माणसं आपल्या दारात नको. राष्ट्रवादीला मत देणार असाल तर अजित पवार धरणं कशी भरणार होते ते आठवा. आम्हाला सत्ता हवी ती गोरगरिबांच्या कल्याणासाठी हवी आहे.