22 January 2019

News Flash

लैंगिक अत्याचाराबद्दल चौघांना जन्मठेप

पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली होती.

( संग्रहीत छायाचित्र )

राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल दोषी ठरलेल्या चौघांना शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा झाली. पुणे जिल्ह्यतील मुलगा, त्याचे आई-वडील व एका महिलेचा समावेश आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांनी ही शिक्षा सुनावली.

सिंधू जालिंदर गायकवाड (वय ६२, रा. आंबळे, ता. पुरंदर), संतोष जालिंदर गायकवाड (वय ४०), जालिंदर बाळू गायकवाड (वय ६८), इंदुबाई भिकाजी भोसले (वय ६५, रा. मांडर, ता. पुरंदर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली होती. पीडित मुलगी अल्पवयीन असून ती पालकांसोबत कासारपुतळे गावात राहात होती. आई रागावल्यामुळे १० नोव्हेंबर २०१४ रोजी मुलगी घरातून निघून गेली. १२ नोव्हेंबर रोजी ती आदमापूर (ता. भुदरगड) येथे संत बाळू मामा मंदिराच्या बाहेर बसली होती. त्या वेळी दर्शनासाठी आलेल्या जालिंदर गायकवाड व सिंधू गायकवाड यांनी तिला सांभाळतो असे सांगून आपल्या गावी आंबळे  येथे नेले. संतोष गायकवाड याच्याबरोबर अल्पवयीन मुलीचे लग्न करून देण्याचा त्यांचा विचार होता. मात्र गावातील लोकांना या बाबत संशय येईल म्हणून गायकवाड दाम्पत्याने मुलगा संतोष व अल्पवयीन मुलीस मांडर (ता. पुरंदर) येथील नातेवाईक महिला इंदुबाई भोसले यांच्याकडे पाठवून दिले. १३ नोव्हेंबर रोजी रात्री संतोष गायकवाड याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. संतोष व इंदुबाई भोसले पीडित मुलीस विकण्याची भाषा करीत होते, त्यामुळे त्यांचा संशय आल्यामुळे पीडित मुलीने संतोषच्या मोबाइलवरून गुपचूप आपल्या गावी फोन करून घडलेली सर्व हकिकत सांगितली. पीडित मुलीच्या नातेवाइकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

First Published on April 8, 2018 4:11 am

Web Title: loksatta crime news 48