कोल्हापुरात ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ

आजच्या तरुणाईला भावणाऱ्या जीवनानुभवाचे विश्व मंगळवारी कोल्हापुरातील नाटय़मंचावर उत्कटपणे सादर करण्यात आले. या आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत पहिल्या दिवशी आशयघन सादरीकरण झाले. यामुळे बुधवारीही सकस नाटय़ानुभव घेण्यासाठी नाटय़प्रेमींची धाव कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयाकडे लागणार आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’ उपक्रमांतर्गत कोल्हापूर केंद्रातील स्पर्धेचे उद्घाटन विवेकानंद महाविद्यालयाच्या बापूजी साळुंखे सभागृहात महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. एम. रुईकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. या वेळी परीक्षक संजय हळदीकर, ‘आयरिश प्रोडक्शन’चे प्रतिनिधी अभय परळकर, रोहिणी परळकर, प्रा. अरिफ महात, चंद्रशेखर दोडमणी उपस्थित होते. परीक्षक प्रमोद काळे यांच्या हस्ते सहभागी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्राची अतोनात हानी झाली. याची झळ शहरी-ग्रामीण भागाला बसली. या महापुराच्या वेदनांचे वास्तव अधोरेखित करणाऱ्या दोन एकांकिका पहिल्या दिवशी सादर झाल्या. यामध्ये महापुराच्या कथेला परंपरेची जोड देत कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयाने जाचक रूढींच्या वर्तुळात होणारा कोंडमारा आणि त्यातील वास्तवाला भिडणारी ‘तिलांजली’ ही एकांकिका सादर केली. तर कृष्णा नदीच्या महापुराच्या विळख्यात बुडालेल्या  कुरुंदवाड येथील दत्त कनिष्ठ महाविद्यालयाने स्वानुभवाचा स्पर्श असलेली ‘मोठ्ठा पाऊ स आला आणि..’ ही एकांकिका सादर केली. महापुराच्या संकटकाळात ताणलेल्या मानवी नातेसंबंधावर झगझगीत प्रकाशझोत टाकला.

सांगलीच्या श्रीमती राजमती  नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाने ‘हिरवीन’ ही एकांकिका सादर केली. अभिनेत्री (हिरॉईन) होण्याच्या अभिलाषेत स्वकल्पनेच्या विश्वात आणि चंदेरी झगमगटात रमणाऱ्या युवतीची कथा खुबीने मांडली.

वडणगे (ता. करवीर) येथील देवी पार्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आजच्या कौटुंबिक वास्तवावर प्रखर टिपणी केली. मुलांची वर्तणूक, त्यासाठी समुपदेशनाची गरज यावर भाष्य करण्यात आले.

कोल्हापुरातील कॉमर्स महाविद्यालयाने काश्मीरच्या तप्त वणव्यात कुटुंबाची होणारी होरपळ व त्यावर मार्ग काढण्यासाठी महात्मा गांधी यांचा विचार कसा मार्गदर्शक ठरू शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या उपक्रमासाठी प्रक्षेपण भागीदार देखील आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.