कोल्हापूर महापालिकेच्या समावेशक आरक्षणामध्ये (अकोमोडेशन रिझर्वेशन) १४ कोटी ५० लाखांचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती बुधवारी पुढे आली. शहरामध्ये २९ ठिकाणच्या आरक्षणामध्ये हा घोळ झाला असल्याचे नगरसेवक भूपाल शेटे यांनी सांगितले.
महापालिकेने सर्वसमावेशक आरक्षणामध्ये दुकान गाळे, वाहनतळ, दवाखाना, वाचनालय, बाजार केंद्र मध्यवर्ती व्यापार संकुल आदींसाठी भूखंडाच्या १५ टक्के जागा महापालिकेला इमारत बांधण्यासाठी परवानगी दिली होती. त्यासाठी भूखंड मालकाकडून मुदतीत बांधकाम करण्याचे करारपत्र घेतले होते. यातील १२ मिळकतधारकांनी मुदत संपूनही महापालिकेचे बांधकाम अर्धवट ठेवून त्यामध्ये अपार्टमेंट दुकानगाळे बांधून त्याची विक्री केली आहे. या प्रकारास महापालिकेचे उपायुक्त, सहायक संचालक नगररचना व या विभागाचे अभियंता, शहर अभियंता जबाबदार आहेत. पाच-दहा वष्रे झाली तरी अधिकाऱ्यांनी या मिळकतधारकांना ना नोटीस दिल्या ना भेटी दिल्या. अधिकाऱ्यांशी आíथक देवघेव झाली असल्याचा आरोप करून शेटे यांनी मोठय़ा प्रमाणातील आíथक भ्रष्टाचाराची चौकशी होण्याची मागणी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
या प्रकरणाच्या अनेक फाईल शहर अभियंत्यांकडे सन २०१० पासून तशाच पडून आहेत. यामध्ये महापालिकेचे जे नुकसान झाले आहे त्याची जबाबदारी म्हणून आयुक्तांनी संबंधित मालमत्तेवर बोजा नोंद करावा. तसेच मुदती संपून गेलेल्या जागी जाऊन आयुक्तांनी महापालिकेच्या इमारती ताबडतोब ताब्यात घेण्याबरोबरच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेटी यांनी केली. मुदत संपलेल्या मिळकतधारकांमध्ये मल्टी कन्स्ट्रक्शनतर्फे ऊर्मिला गो. लाटकर, संग्राम सरनोबत यांचे २२४ चौ. मि. क्षेत्राची किंमत १ कोटी १० लाख, घाटगे इस्टेट डेव्हलपर्स तर्फे प्रवीणसिंह घाटगे यांचे ४१४ चौ.मि. क्षेत्राची किंमत २ कोटी ५४ लाख रुपये आदींचा समावेश आहे.