मोबाईलला विमा संरक्षण मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या ‘पिक-मी’ या कंपनीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारांहून अधिक मोबाईल धारकांना फटका बसला आहे. ना पॉलिसीची किंमत ना हरवलेला मोबाईल, अशा दुहेरी कोंडीत मोबाईल ग्राहक सापडले आहेत. तर या कंपनीचे वितरक चंदवाणी यांनी आपली २५ लाखाची गुंतवणूक बुडाली असल्याचा दावा करीत कंपनीवर दावा करणार असल्याचे म्हटले आहे.
मुंबईस्थित ‘पिक-मी’ या कंपनीने मोबाईल ग्राहकांना विमा संरक्षण मिळवून देणारी योजना आखली होती. त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. करवीरसह जिल्ह्यातील अनेक भागांतील हजारांहून अधिक मोबाईल ग्राहकांनीही याचे सदस्यत्व स्वीकारले. त्यांनी आपल्या गॅझेटमध्ये दोष निर्माण झाल्याने त्याचा क्लेम मिळण्यासाठी कंपनीकडे दावा केला. मात्र कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आपण फसलो गेलो असल्याचे लक्षात आले असून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.