कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सीमावर्ती भागात पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांकडून सीमा भागात १४ ठिकाणी सीमा बंदिस्त करण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सीमावर्ती भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, निवडणूक निर्भयपणे पार पडावी. यासाठी महाराष्ट्र,  कर्नाटक, गोवा या राज्यातील पोलीस आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांची मंगळवारी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयात सीमा बैठक झाली. कोल्हापूरचे परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

यामध्ये परराज्यातील अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती आदानप्रदान करणे, गोव्यातून होणारी अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी नाका बंदी सक्षम करणे, एका राज्यात गुन्हेगारी करून शेजारच्या राज्यात जाणे, शस्त्रास्त्र तस्करी करणे असे प्रकार होतात. हे रोखण्यासाठी सीमा भागात विशेष गस्ती पथक नेमावेत, ठिकठिकाणी नाकाबंदी करून गुन्हेगारांना रोखण्याचा प्रयत्न करावा. निवडणूक काळात मतदारांना आर्थिक आमिष दाखवण्यासाठी पैशाचे वाहतूक होऊ  नये, याची खबरदारी घ्यावी.

कोल्हापूर पोलिसांकडून सीमा भागात १४ ठिकाणी सीमा बंदिस्त करण्यात आल्या आहेत. त्याच पद्धतीने सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सोलापूर पोलिसांनी कराव्यात. सीमा भागात होणारे बोगस मतदान रोखण्यासाठी उपाययोजना करणे, २३ एप्रिलला  मतदान दिवशी सवर्त् कोरडा दिवस जाहीर करण्यात येणार आहे. सीमावर्ती भागातील पोलिसांच्या हिस्टरीलीस्टवरील गुन्हेगार पसार आहेत. त्याचा शोध घेऊन कारवाई करणे. यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे अभिजित चौधरी, बेळगाव उत्तरचे विशेष पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास, बेळगावचे पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, बेळगाव ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुधीरकुमार रेड्डी, बिजापुरचे पोलीस अधीक्षक  प्रकाश निकम, गुलबर्गा पोलीस उप अधीक्षक  टी. एस. सुलपी, सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सांगलीचे पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा हे उपस्थित होते.