‘श्रीमान योगी’ कार पद्मश्री रणजित देसाई यांचे जावई मदन नाईक यांचा कर्नाटक हद्दीत खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कोल्हापुरात राहणारे नाईक हे उद्योजक होते. ते गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. आज कर्नाटकातील कारदगा गावच्या हद्दीत छिन्नविच्छिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्याखुनाचे कारण समजू शकलेले नाही.
दिवंगत रणजित देसाई यांना दोन पत्नी होत्या. पहिल्या पत्नीपासून झालेली पारुबाई ही मुलगी मदन नाईक यांना दिली होती. नाईक कोल्हापुरात राहत होते. त्यांचा शिवशक्ती ट्रान्सपोर्ट हा व्यवसाय आहे. रेंदाळ येथे त्यांची अकरा एकर शेती आहे.
गेले दोन दिवस ते बेपत्ता होते. त्यांची मोटार आणि मोबाईल शेतातच होता. त्यांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू ठेवला होता. त्यांनी हुपरी पोलिसांशी संपर्क साधला होता. आज त्यांचा हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह कारदगा या कर्नाटक राज्याच्या हद्दीत आढळला. अज्ञातांनी डोक्यावर वर्मी घाव घालून खून करून मृतदेह ऊसाच्या शेतात टाकला होता. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली आहे. चिकोडीचे अप्पर पोलीस अधिक्षक मिथुनकुमार व पोलीस निरीक्षक संगमेश दिडगिनहाळ घटनास्थळी येवून पाहणी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 25, 2019 11:58 pm