भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांचा सवाल

शरद पवार हे केंद्र शासनामध्ये कृषिमंत्री होते. तेव्हाच त्यांनी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी का स्वीकारल्या नाहीत, असा प्रतिप्रश्न करत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी बुधवारी येथे पवारांवर शरसंधान केले.

गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार आणि मनसे नेते राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत आहेत, याचाच संदर्भ देत भंडारी यांनी वरील टीका केली. ते म्हणाले की, खरे तर पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी असताना त्यांनीच स्वामिनाथन आयोगाची स्थापना केली होती. पवार केंद्र शासनामध्ये कृषिमंत्री असताना स्वामिनाथन अहवाल सादर झाला होता. शरद पवार यांना हल्ली शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी ते करतात. त्यासाठी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या पाहिजेत असा आग्रह धरतात.  मात्र सत्तेत असताना पवारांनी या शिफारशींची अंमलबजावणी का केली नाही , असा सवाल त्यांनी  उपस्थित केला. राज ठाकरे यांच्यावर टीका करताना भंडारी म्हणाले की, ज्यांचाकडे साधा एक नगरसेवक, पंचायत समिती सदस्य नाही ते लोक ‘मोदी मुक्ती’ची भाषा करत आहेत, हे खूप हास्यास्पद आहे. मनसेला जनतेने त्यांची जागा यापूर्वीच दाखवली आहे अशीही टीका त्यांनी केली.