31 October 2020

News Flash

भाजपच्या चुका महाविकास आघाडीला दुरुस्त कराव्या लागतील – शरद पवार

गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारकडून अनेक चुका झाल्या आहेत

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. (छाया - राज मकानदार)

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारकडून अनेक चुका झाल्या आहेत. त्या महाविकास आघाडीला दुरुस्त कराव्या लागतील. एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते मान्यताप्राप्त संघटनेला विश्वासात घेऊन सोडवावे लागतील. त्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जबाबदारी घ्यावी. अर्थखाते अजित पवार यांच्याकडे असल्यामुळे ही जबाबदारी मी घेतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे ५६ वे राज्यव्यापी वार्षिक अधिवेशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली येथे पार पाडले. या अधिवेशनाचे उद्घाटन खासदार पवार यांच्या हस्ते झाले.

गेल्या पाच वर्षांतील एसटीचा संचित तोटा पाच हजार कोटींचा आहे. यात बदल करायला पाहिजे. एसटीचा दर्जा सुधारुन प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा दिल्यास येत्या तीन वर्षांत हे चित्र नक्कीच बदलेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. अनेक ठिकाणी एसटी कामगारांना दोन-तीन महिने वेतन मिळत नाही याला राज्यकर्ते जबाबदार आहेत. ही चूक तत्काळ सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, की प्रवासी वाहतूक फायद्यात नाही म्हणून एसटी कामगारांना उपाशी ठेवणार नाही. एसटी महाराष्ट्राची जीवनरेखा आहे. एसटीकडे १८ हजार स्वत:च्या गाडय़ा आहेत. त्या धावण्यायोग्य नाहीत म्हणून २ हजार नव्या गाडय़ा खरेदी करण्यात येणार आहेत. गेल्या चार वर्षांत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष केला; मात्र यापुढील काळात संघर्ष करावा लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील,एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे,  जिल्हा सचिव उत्तम पाटील, सरचिटणीस हनुमंत ताटे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार  ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, महापौर निलोफर आजरेकर  उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 3:59 am

Web Title: maha vikas agahdi have to repair bjp mistake says sharad pawar zws 70
Next Stories
1  ‘कोल्हापूर प्राधिकरणा’चे चाक खोलातच
2 ‘जेसीबी’ लावून शिवपुतळा हटवणे संतापजनक – संभाजीराजे
3 तरुणीच्या छेडछाडीवरून कृषी महाविद्यालयात वाद
Just Now!
X