कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या बहुराज्य ठरावावरून संघाचे नेते, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यात जुंपली असताना आता महाडिक यांनी टीकेचा रोख आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला असून दोघांत आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली आहे.

मुश्रीफ यांनी बहुराज्य ठरावाला विरोध करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर महाडिक यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. मुश्रीफ यांनी दिलेला शाप हा विषारी नागाचा फुत्कार आहे. त्या शापाने माझी भरभराटच होणार आहे. आगामी निवडणुकीत महाडिक नव्हे तर मुश्रीफ हेच राजकारणातून हद्दपार होणार आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

जिल्हा बँकेत कॉम्प्युटर हार्डवेअर पुरविणाऱ्या कंपनीने संचालकांना दुबईवारी घडविली. बँकेच्या सर्व एटीएमचे काम हैदराबादच्या इब्राहिम या व्यक्तीला  दिले, या दोन्ही सहलीवेळी संचालकांनी धिंगाणा घातला. गोकुळ बहुराज्यच्या मुद्दय़ांवर मुश्रीफ-सतेज पाटील यांना एका व्यासपीठावर यावे, असे आव्हान महाडिक यांनी दिले.

महाडिकांवर बदनामी दावा

केवळ आपल्या बदनामीसाठी खोटे व गंभीर आरोप करणाऱ्या महादेवराव महाडिक यांच्यावर पाच कोटी रुपयांचा फौजदारी बदनामी दावा दाखल करणार असल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. खोटी वक्तव्ये करून संबंध जिल्ह्यची ते दिशाभूल करीत असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला.

येत्या आठ ते दहा दिवसांत या आरोपांबद्दल ची वस्तुनिष्ठता त्यांनी सांगावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे असेही त्यांनी म्हटले आहे.

गोकुळ दूध संघ बहुराज्यला विरोध करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवले. ते माझं वक्तव्य यांच्या एवढं मनाला का लागले असा सवालही त्यांनी केला. महादेवराव महाडिक यांनी महानंदा दूध संघांमध्ये हैदराबादची तीनशे मुले मी भरल्याचा आरोप केला होता.

महानंदामध्ये भाजप सरकारची सत्ता असून तिथे एकनाथ खडसेंच्या पत्नी अध्यक्षा आहेत. त्या मुलांची नावे त्यांनी जरूर जाहीर करावीत, असे आव्हान त्यांनी दिले.

बँकेच्या संचालकांच्या मॉरिशस व हैदराबाद येथील सहलीबाबत स्पष्टीकरण देताना मुश्रीफ म्हणाले, महाडिक हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. बँकेमध्ये आतापर्यंत हार्डवेअरची खरेदीच झाली नाही. संचालकांच्या या सहली या स्वखर्चातून झालेल्या आहेत. महाडिक हे तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुलेच आहेत. त्यांनी कधीही या विषयांची सीआयडी चौकशी लावावी आणि तो खर्च झालेला पैसा प्रायोजित होता की व्यक्तिगत होता हे त्यांनी शोधावे, असे आव्हानही मुश्रीफ यांनी दिले.