सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व

कोल्हापूर : राज्यातील सर्वात मोठय़ा ‘गोकुळ’मध्ये (कोल्हापूर जिल्हा दूध संघ) मंगळवारी सत्तांतर घडले. रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या या मतमोजणीत एकूण २१ पैकी १७ जागांवर विजय मिळवत विरोधी गटाने हा बदल घडवला आहे. सत्ताधारी गटाला केवळ ४ जागांवरच समाधान मानावे लागले. या निकालामुळे राज्यातील सर्वात मोठय़ा दूध संघावर पालकमंत्री सतेज पाटील आणि  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाचे वर्चस्व निर्माण केले असून भाजपकडे झुकलेल्या महाडिक गटाच्या ‘गोकुळ’मधील तीस वर्षांच्या सत्तेला शह मिळाला आहे.

‘गोकुळ’ हा राज्यातील सर्वात मोठा तर देशातील आघाडीचा दूध संघ आहे. ५८ वर्षांंपूर्वी स्थापन झालेल्या या दूध संघाचे संकलन प्रतिदिन १४ लाख लिटर आहे. अडीच हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या संघावर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, नेत्यांची स्पर्धा असते. गेल्या काही वर्षांपासून ‘गोकुळ’वर महाडिक गटाचीच सत्ता आहे. या संस्थेच्या जीवावरच या गटाकडून जिल्ह्य़ातील राजकारणही खेळले जात होते. त्यांच्या गटाचे हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी यंदा सतेज पाटील, हसन मुश्रीफ, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक या सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत विरोधी आघाडी उभी केली होती. सत्ताधारी गटाकडून माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे माजी आमदार अमल महाडिक, काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील हे किल्ला लढवत होते. करोना निर्बंधामुळे विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यावर बंदी होती.

‘गोकुळ’ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा व्हावा ही आमची इच्छा होती. त्याला मतदारांनी अनुकूल कौल दिला आहे. दुधाला प्रति लिटर दोन रुपयांची वाढ देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण करू.

– सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर</strong>