News Flash

महालक्ष्मी, जोतिबा मंदिर विकासाची कामे रेंगाळली

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ८० कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असून ९ कोटी रुपये महापालिकेकडे उपलब्ध झाले आहे

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मंदिर तीर्थक्षेत्रासाठी भरीव निधीची घोषणा केली आहे. पूर्वी जाहीर केलेल्या तीर्थक्षेत्र, मंदिर विकासाच्या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा या प्रमुख मंदिरांच्या बाबतीत हेच चित्र ठळकपणे पाहायला मिळते.

भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने पहिल्याच अर्थसंकल्पात स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध प्राचीन मंदिरांचे संवर्धन करण्यासाठी आठ मंदिरांकरिता १०१ कोटी रुपये नियतव्यय प्रश्न प्रस्तावित केला आहे. यामध्ये कोल्हापुरातील कोपेश्वार मंदिराचा समावेश आहे. याच कोल्हापुरातील मंदिर, तीर्थक्षेत्र उभारणीची गती निराशाजनक आहे. कोल्हापुरात करवीर निवासिनी महालक्ष्मी, दख्खनचा राजा जोतिबा, नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर अशी प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. येथे भाविकांची गर्दी वाढत असल्याने विकासाची कामे प्रस्तावित आहेत.

सर्वाधिक महत्त्व असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या विकासासाठी पहिल्यांदा सन २००८ साली विकास आराखडा बनवण्यात आला. यथावकाश तो बासनात गुंडाळला गेला. मागे काँग्रेस-राष्ट्रवादीचे शासन असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १० कोटींची तरतूद केली खरी; पण निधी अखर्चीत राहिल्याने शासनाकडे परत पाठवण्याची वेळ आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीत जानेवारी २०१८ मध्ये या मंदिराच्या २५० कोटींच्या तीर्थक्षेत्र आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

पहिल्या टप्प्यासाठी ६५ कोटींचा प्रस्ताव तयार केला. जीएसटी लागू झाल्यामुळे प्रकल्पाची किंमत ८० कोटींवर गेली. या कामाची जबाबदारी कोल्हापूर महापालिकेकडे सोपवण्यात आली. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने आराखडा मंजूर झाला तेव्हा पहिल्या टप्प्यात दर्शन मंडप, भक्त निवास, वाहनतळ, मंदिर प्लास्टिकमुक्त, निर्माल्याचे विलगीकरण प्रक्रिया आदी कामांचा समावेश केला होता. याची घोषणा मंत्रालयात केल्यावर कोल्हापुरात जोरदार स्वागत झाले होते. सद्य:स्थितीत एकच काम सुरू असून अवघा आराखडा कागदोपत्री उरला आहे. बहुमजली वाहन तळाचे एकमेव कामकाज गतवर्षी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सुरू झाले. तेव्हा त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वाासन दिले. शासनाकडून नव्याने कोणताही निधी अद्याप मिळाला नसल्याने मंदिर विकासाची कामे प्रलंबित आहेत.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ८० कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असून ९ कोटी रुपये महापालिकेकडे उपलब्ध झाले आहे. सव्वाआठ कोटी रुपये खर्चाचे बहुमजली वाहनतळ मंदिराजवळ बांधले जात आहे. मार्च महिन्यानंतर आणखी ५० कोटी रुपये उपलब्ध होतील. त्यानुसार प्रस्तावित कामे मार्गी लागतील, असे महापालिकेचे नगररचनाकार नेत्रदीप सरनोबत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी परिसर विकास आराखडा १५५ कोटींचा तयार करण्यात आला. जून २०१६ मध्ये २५ कोटींचा पहिला टप्पा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘सध्या येथे दर्शन मंडप, भक्त निवास, सासनकाठी सोहळ्याच्या गर्दी नियोजनासाठी स्टेडियम, सांडपाणी, घनकचरा प्रकल्प ही कामे प्रगतिपथावर आहेत,’ असे पश्चिाम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांनी सांगितले. तथापि, आराखड्यातील सर्व कामांना निधी मिळून ती कधी पूर्ण होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.

नृसिंहवाडीतील भक्त निवास न्यायप्रविष्ट

पश्चिाम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या नृसिंहवाडी येथे बहुपयोगी सभागृह तथा भक्त निवास बांधण्याचे काम सुरू आहे. अडीच कोटी रुपये खर्चाच्या कामाला गती मिळाली असताना ते न्यायप्रविष्ट झाले आहे. एकंदरीत, कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरांच्या विकासाबाबतीत प्रत्येक सरकार भलामोठा निर्धार करीत असले तरी कृतीचा दुष्काळ आहे. प्राचीन मंदिराच्या विकासाची घोषणा करणाऱ्या शासनाने कोल्हापुरातील मंदिराच्या प्रलंबित कामांना गती देण्याची अपेक्षा नागरिक, भाविकांकडून होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 12:13 am

Web Title: mahalakshmi jotiba temple development work lingered abn 97
Next Stories
1 गोकुळच्या निवडणुकीसाठी विरोधकांची महाविकास आघाडी
2 ‘गोकुळ’ची निवडणूक अटळ
3 सीमाभागात पुन्हा धगधग
Just Now!
X