करवीर निवासिनी महालक्ष्मीचे कोणत्याही क्षणी दर्शन देणारी स्वत:ची वाहिनी आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सुरू होणार आहे. यामुळे महालक्ष्मी देवीचे नित्य पूजाविधी तसेच सर्वाधिक आकर्षण असलेला नवरात्रोत्सव सोहळा घरबसल्या पाहता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने एका खासगी कंपनीच्या सहकार्याने ही अष्टोप्रहर चालणारी वाहिनी सुरू करण्याचे ठरवले आहे. यामुळे देशविदेशातील भाविकांची सोय होणार असून दुसरीकडे देवस्थान समितीच्या तिजोरीतही लाखमोलाची भर पडणार आहे.

कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या (अंबाबाई) मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधल्याचे मानले जाते. कोल्हापूरची अंबाबाई ही अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरत असल्याने देवीच्या दर्शनासाठी बारमाही भक्तांची रीघ लागलेली असते.

नवरात्रोत्सवात तर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. तरीही भाविकांची देवीच्या दर्शनाची तिचे पूजाविधी- सोहळे पाहण्याची आस कायम असते. ही गरज ओळखून देवस्थान समितीने देवीचे दर्शन देणारे एक ‘अ‍ॅप’ बनवले आहे. पण याच्याही पलीकडे नित्य दर्शन देण्यासाठी एका खासगी कंपनीच्या मदतीने लवकरच एका वाहिनीची सुरुवात होणार आहे. यामुळे मंदिरात सातत्याने चालणारे धार्मिक विधी, किरणोत्सव, रथोत्सव, प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची निघणारी मिरवणूक, चैत्र-अश्विन महिन्यातील उत्सव तसेच नवरात्र उत्सव काळात मंदिरात चालणारे भजन-कीर्तन, गायन आदी कार्यक्रम जगभरातील भाविकांना घरबसल्या पाहता येणार आहेत.

मंदिराला उत्पन्नाचे साधन

या वाहिनीच्या माध्यमातून देवस्थान समितीच्या तिजोरीत लक्ष्मी चालून येणार आहे. कोणा भाविकांना देणगी वा अभिषेक आदि विधींसाठी रक्कम द्यायची असेल तर त्याची सोय याच्या माध्यमातून ‘ऑनलाइन’ होणार आहे. वाहिनी सुरू असताना आगामी कार्यक्रम, सूचना याची माहिती देणाऱ्या वाहत्या पट्टीची सोय असणार आहे. त्यावरूनच व्यावसायिक स्वरूपाच्या जाहिराती प्रसारित करता येणार असल्याने त्यातून मंदिराला उत्पन्न मिळणार आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या ऑनलाइन आवृत्तीसाठी या लिंकचा विनाशुल्क वापर करता येणार आहे. मोबाइल आणि जिओ टीव्हीच्या माध्यमातून याचे प्रक्षेपण होणार असल्याने भाविकांना कोणत्याही क्षणी दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. शिवाय, याचे प्रक्षेपण केल्याने जिओ कंपनीकडून वार्षिक ३० लाख रुपये देवस्थान समितीला मिळणार आहे. त्यामध्ये तीन वर्षांनी वाढ केली जाणार आहे,असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.