पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

नोकरी देण्यावरून केंद्र शासन आणि तूरडाळ खरेदी करण्यावरून राज्य शासन लोकांना फसवत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी गडिहग्लज येथे पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्र्यांनी तूरडाळ खरेदीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचे जाहीर केले असले तरी त्यातील सत्य उलगडण्यासाठी सीबीआय करावी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या घोटाळय़ात तूरडाळ खरेदी करणारे व्यापारी, दलाल व सट्टेबाज यांचा हात असल्याचा संशय त्यांनी बोलून दाखवला.

गडिहग्लज येथे एका सत्कार समारंभासाठी आलेल्या चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी केंद्र व राज्य शासनावर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, केंद्रात सत्ता मिळवल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्षांला २ कोटी रोजगार देण्याचे कबूल केले होते. ३ वर्षांत ६ कोटी तरुणांना नोकऱ्या मिळणे अपेक्षित असताना अवघ्या दीड लाख नोकऱ्या मिळाल्या आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण घटत आहे.

महाराष्ट्रातील विद्यमान सरकार तर सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे, असा आरोप करून चव्हाण यांनी तूरडाळ घोटाळा, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या व दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी मागणी केली. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा एक न्याय मिळतो आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दुय्यम स्थान देऊन दिशाभूल, फसवणूक केली जाते.

राज्यातील युती शासनाच्या कारभाराचे वाभाडे काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे. संघर्ष यात्रेचे तिसरे पर्व उद्या बुधवारी रायगड येथे शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सुरू होणार आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्यांत ही यात्रा निघणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघर्ष यात्रेत फडणवीस सरकारच्या कारभाराची लक्तरे मांडली जात आहेत. यापुढे वीजदर वाढ प्रश्नांवर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

तूरडाळ खरेदीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे, पण प्रत्यक्षात तो एक हजार कोटीचा आहे, असा उल्लेख करून त्यांनी एकूणच तूरडाळ खरेदी घोटाळा हा संशयास्पद असल्याचे म्हटले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. सुरेश कुराडे, दिग्विजय कुराडे उपस्थित होते.