कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून चर्चेत असलेल्या मराठा आरक्षण संघर्ष समितीने आता या मुद्दय़ावरून निवडणुकीच्या आखाडय़ात उतरण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्राथमिक हालचालींना गती दिली आहे.  लोकसभेच्या उर्वरित ४७ जागांवर पक्षाचे  उमेदवार असतील, अशी घोषणा  पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली आहे. सातारा मतदारसंघ खासदार  उदयनराजे भोसले यांच्यासाठी सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाल्याने युती शासनास जनतेने संधी दिली. पण त्यांनीही बोजवारा वाजवला. त्यामुळे जनता कंटाळली असून महाराष्टक्रांती सेनेकडे पर्याय म्हणून पहात असल्याचा दावा करून पाटील म्हणाले, ‘निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली, त्यामुळे राज्यभर नव्याने लढा उभारणार आहोत. लवकरच पक्षाचा जाहीरनामा मुंबईत प्रसिध्द करण्यात येणार आहे. पत्रकार परिषद कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट, उपाध्यक्ष भरत पाटील, चंद्रकांत सावंत, परेश भोसले  उपस्थित होते.

लोकसभा मतदारसंघनिहाय उमेदवार

सांगली -महादेव साळुंखे,  माढा -उमेश पाटील, उस्मानाबाद -रामजीवन बोंदर, रत्नागिरी सिंधुदुर्ग -एस.टी.सावंत, रायगड -विलास सावंत, ठाणे -रवींद्र साळुंखे, उत्तर मध्य मुंबई -उल्हास पाटील, कल्याण -धनराज शहा, मावळ -बाबासाहेब पाटील, जळगाव -वंदना पाटील, नाशिक -शरद शिंदे-पाटील, बीड -अ‍ॅंड. गणेश करांडे, जालना -प्रा. पांडुरंग मांडकीकर, दिंडोरी -अभिजित गायकवाड.