News Flash

एरवी तत्त्वाच्या गप्पा आता सर्व पक्ष खुले

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अनेकजण पक्षांतरच्या पवित्र्यात

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अनेकजण पक्षांतरच्या पवित्र्यात

कालपर्यंत जातीयवादी पक्षाशी आघाडी केल्यावरून एकमेकांना तत्त्वाच्या गप्पा मारत दूषणे देणारे राजकीय पक्ष व त्यांचे नेते जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र सर्वच पर्याय खुले असल्याचे सांगत सत्तासंग करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्’ाात कोणत्याच पक्षाला कोणाचीच राजकीय अ‍ॅलर्जी नसल्याचे दाखवून देत असल्याने एकापरीने पुरोगामी विचाराबरोबरच राजकीय तत्त्व, भूमिका, धोरण यालाही पंचगंगा काठी मूठमाती मिळताना दिसत आहे.

नगरपालिका निवडणुकीवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यात कलगीतुरा अजूनही रंगलेला आहे. भाजपला जातीयवादी पक्ष असे हिणवणाऱ्या मुश्रीफांना त्यांचा कागल पालिकेत शिवसेनेची सत्तासोबत कशी चालते, असा सवाल पालकमंत्री पाटील यांनी उपस्थित करत मुश्रीफ यांच्याबरोबरच शिवसेनेची कोंडी केली आहे. तर, राष्ट्रवादीला पाण्यात बघणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना इचलकरंजी पालिकेत सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी कशी चालते, अशी विचारणा करत मुश्रीफ यांनी पालकमंत्र्यांना िखडीत गाठले. या आठवडय़ापर्यंत ही टीकाटिप्पणी सुरू असताना जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र भाजप, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांची भलत्याच मार्गाने राजकीय वाटचाल सुरू राहिली आहे. यामुळे या राजकीय पक्षांचा मूळ विचार, राजकीय धोरण कोणते यावरून सामान्य नागरिक मात्र गोंधळात पडला आहे,

चेहरा एक मुखवटा दुसराच

भाजप नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेत सत्ता आणण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ज्या- त्या तालुक्यातील प्रबळ गटाशी जुळवून घेण्याचे ठरवले आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीतील प्रमुखाच्या हाती कमळ देण्याची मोहीमच त्यांनी उघडली आहे. राष्ट्रवादीचे वजनदार नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल तालुका वगळता अन्यत्र भाजपाशीही हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही ग्रामीण भागातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी योग्य वाटणाऱ्या पक्षाशी मत्री करण्याचा इरादा व्यक्त करत पत्ते खुले केले आहेत.

माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य धर्यशील माने यांनी स्वाभिमानी वगळता कोणाशीही घरोबा करण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र, रेंदाळ जिल्हा परिषद मंतदारसंघातील इच्छुक उमेदवार राहुल आवाडे यांनी काँग्रेसमधून डावलले गेल्यास स्वाभिमानी, शिवसेना यांच्याशी आघाडी करण्याची तयारी चालवली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना मानणारा वर्ग स्थानिक पातळीवर काँग्रेसचे राजकारण करत असला तरी आता तो नमो मंत्र म्हणताना दिसत आहे.

राजकीय नेत्यांची ही भूमिका पाहता गरजेच्या वेळी सोयीचे धोरण हे सूत्र अवलंबले जाताना दिसत आहे. जिल्हा परिषद निवणुकांचा प्रचार शिगेला पोहोचू लागेल तसतसे काँग्रेस – राष्ट्रवादीचे बडे नेते सभा गाजवण्यासाठी जिल्ह्य़ात येतील तेव्हा पुरोगामित्वाची जपमाळ ओढताना दिसतील, पण याचवेळी उभय काँग्रेसच्या तालुकास्तरावरील नेत्यांनी सोयीची राजकीय सोयरीक केलेली असल्याने त्यांच्या भाषणाला कितपत अर्थ उरला असेल, हाही एक प्रश्नच असणार आहे. उलट पोकळ पोपटपंची टीकेला कारण ठरणार आहे.

अगोदरच हातमिळवणी

राष्ट्रवादीकडून जातीयवादी पक्षाशी सत्तासंग करण्यावरून टीका होत असली तरी खरे रूप वेगळेच आहे. कागलमध्ये खुद्द मुश्रीफ यांनी शिवसेनेशी जवळीक साधली. तर, त्यांच्याच पक्षाचे शाहूवाडीचे नेते मानसिंगराव उदयसिंगराव गायकवाड यांनी शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांच्याशी अगोदरपासूनच जुळवून घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 1:05 am

Web Title: maharashtra municipal elections
Next Stories
1 हाणबरवाडी कोल्हापूर जिल्ह्यतील पहिले ‘रोकडरहित’ गाव
2 कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग
3 ‘कार्यकर्त्यांना संधी न दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी अडचणीत’
Just Now!
X