बेंगलोरकडे  जाणाऱ्या पर्यटकांच्या मोटारीचा टायर फु टल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजकावरून पलीकडे जाऊ न समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात मोटारीतून प्रवास करणारे औरंगाबाद येथील सात तरुण प्रवासी ठार झाले. यात पाच जण जागीच, तर दोघे जण उपचार घेत असताना मृत्यू पावले. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बेळगाव जवळ रविवारी दुपारी हा अपघात झाला.

नंदू पवार, अमोल नेवी, सुरेश कणेरी, अमोल चौरी, महेश पांडळे, महेश चावरे,  गोपाळ पाटील अशी प्रवाशांची नावे असून मृतांची ओळख नातेवाईक बेळगावला आल्यानंतर होईल असे पोलिसांनी सांगितले.

औरंगाबाद येथील सात प्रवासी बंगलोर येथे मोटारीने  निघाले होते. बेळगाव जवळील महामार्गावर श्रीनगर गार्डन येथे मोटार आली असताना तिचा पुढील बाजूचा टायर फुटला. मोटार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. मोटार रस्ता दुभाजकावरून पलीकडील बाजूच्या रस्त्यावर गेली. याचवेळी विरुद्ध दिशेने म्हणजे धारवाड येथून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकला मोटारीची जोरदार धडक बसली. धडक जोरदार असल्याने मोटार रस्त्यावरच आदळून उलटी झाली.  ट्रकचा पुढील बाजूचा पत्रा विस्कटला होता. दोन्ही वाहनांचे  मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातात मोटारीमधील प्रवाशांच्या डोक्याला आणि मानेला जबर मार लागला. या भीषण अपघातात मोटारीतील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. त्यातील दोघे पुढील बाजूस बसले होते. चालक व अन्य एक जण, तर मधल्या बाजूस बसलेले तिघेही ठार झाले. अगदी मागे बसलेले दोघे जण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पुणे औरंगाबाद येथून प्रवाशांचे नातेवाईक बेळगावला येण्यासाठी निघाले. बेळगावचे पोलिस आयुक्त बी. एस. लोकेश कुमार, वाहतूक व गुन्हे विभागाच्या अधिकारी यशोदा वंटगोडी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊ न पाहणी केली. बेळगाव वाहतूक उत्तर विभाग पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.