News Flash

कृष्णा कारखाना निवडणुकीत महाविकास आघाडी?

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्याचे कार्यक्षेत्र हे सातारा व सांगली जिल्ह्यात आहे.

|| दयानंद लिपारे

भोसले गटाला शह देण्याचे प्रयत्न; सातारा, सांगली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र

कोल्हापूर : संथ वाहणाऱ्या कृष्णामाई काठच्या ‘कृष्णा सहकारी साखर कारखान्या’चे राजकारण मात्र नेहमीच खळाळते राहिले आहे. प्रत्येक निवडणुकीत सत्तेला नवा वळसा घालण्याचा इतिहास असताना यावेळच्या निवडणुकीत काय घडणार याची उत्सुकता आहे. कोल्हापुरात गोकुळच्या निवडणुकीत भाजप विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सहकारातील निवडणूक लढण्याचे सूत्र यशस्वी झाले. हेच सूत्र कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत अमलात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र भाजपच्या नेतृत्वाखालील भोसले पिता-पुत्रांच्या सत्तेला शह देताना माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, सहकार मंत्री यांच्या भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्याचे कार्यक्षेत्र हे सातारा व सांगली जिल्ह्यात आहे. सांगली जिल्ह्यात चाळीस टक्क्यांहून अधिक मतदान असल्याने या भागातील कौल निर्णायक ठरत आला आहे. गेल्या निवडणुकीत भोसले आघाडीचे १५, तर सत्ताधारी संस्थापक पॅनेलचे ६ उमेदवार विजयी झाले. डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या आघाडीला खातेही उघडता आले नाही.

गेल्या पाच वर्षांत कृष्णेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. या वेळी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपत आली आहे. अशावेळी दोन्ही मोहित्यांची दिलजमाई होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृष्णाचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि पंढरपूर संस्थानचे माजी अध्यक्ष, भाजपचे सरचिटणीस, डॉ. अतुल भोसले यांच्या विरोधात सारे असे चित्र असले तरीसुद्धा शेवटच्या टप्प्यात ऐक्य घडणार का, महाविकास आघाडीचे स्वरूप प्रत्यक्षात येणार का याला महत्त्व आहे.

मोहित्यांचे प्रीतिसंगम

कृष्णा कारखान्याचे पन्नास हजार सभासद आहेत. गेल्या पाच वर्षांच्या काळात भोसले यांनी कारखान्यावरील मांड आणखी पक्की केली असताना अविनाश आणि इंद्रजित या दोन्ही मोहित्यांची ताकद एकवटली तर भाजपच्या नेतृत्वाला शह देता येणे शक्य आहे, अशी एक रणनीती आखली जात आहे. त्यातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जावी यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी यासाठी पुढाकार घेतला असून दोन्ही मोहित्यांचे प्रीतिसंगम घडवले जात आहे. एकोपा घडणार का याविषयी कुतूहल आहे. गोकुळमध्ये महाविकास आघाडी घडविताना वर्षभर अगोदरपासूनच विरोधकांनी तयारी सुरू ठेवली होती. तुलनेने कृष्णेत असा आकार देण्याचा प्रयत्न अखेरच्या टप्प्यात सुरू झाला असल्याने त्याला मर्यादाही आल्या आहेत.

सांगलीकर निर्णायक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांची भूमिका महाविकास आघाडीत निर्णायक भूमिका ठरणार आहे. सांगली जिल्ह्यातील ४० टक्के मतदारांवर पाटील यांचा प्रभाव आहे. हे ओळखून अतुल भोसले यांनी पाटील यांना मानणाऱ्या नऊ जागा त्यांच्या गटाला देण्याचा त्यांचा इरादा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातारा दौरा असताना माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी भेट घेतली असता त्यांनी मदत करणार अशी ग्वाही दिली. पाटील गोटातील उमेदवार जितक्या ताकदीचे आहेत तितका प्रभाव विरोधी उमेदवारात नसल्याचे दिसते. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना मानणारे कृष्णा कारखान्यांमध्ये फारसे मतदार नाहीत.

काँग्रेसचे नेते चव्हाण – कदम यांना मानणारे सभासदही सीमित आहेत. चव्हाण- कदम यांच्या मांडीला मांडी लावून जयंत पाटील बसणार का, हाही प्रश्न उरतोच. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातलेच तर महाविकास आघाडीला आकार येऊन सत्ता समीकरण बदलले जाऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 12:12 am

Web Title: mahavikas alliance shivsena congress ncp in krishna factory election akp 94
Next Stories
1 कोल्हापूर जिल्हा बँकेकडून पीक कर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती
2 वाढीव संसर्गदरामुळे कोल्हापूरकरांना दिलासा नाही
3 ‘निवडणुकीबाबतचे अधिकार वरिष्ठ नेत्यांना’
Just Now!
X